ठाणे : गस्तीवर असताना झालेल्या अपघातात वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन खटे (४५) यांचा मृत्यू झाला. मागील सहा दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सचिन यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार सचिन खटे हे कार्यरत होते. ते कांदीवली येथे त्यांच्या कुटुंबासोबत वास्तव्यास होते. १८ मार्चला मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ते संकल्प चौक परिसरात गस्ती घालत होते. त्यावेळी त्यांचे वाहन पदपथावर गेले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन यांचा स्वभाव मनमिळावू आणि चांगला होता अशी माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली.