नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडे उत्साह दिसत असताना ठाण्यात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. घोडबंदर परिसरातील गायमूख येथे एक रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीवर धाड टाकून पोलिसांनी ९५ तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यात पाच महिलांचा समावेश आहे. ही पार्टी अवैधरित्या आयोजित करण्यात आली होती, तसेच तिथे अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरूण आयोजकांनी या पार्टीचे अवैधरित्या आयोजन केले होते. त्यांना ताब्यात घेतले आहे. पार्टीतून एलएसडी, चरस, एक्स्टसी गोळ्या आणि गांजा हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी आशुतोष डुंबरे यांनी २१ डिसेंबर रोजी ठाणे पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता, त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना याबद्दलची माहिती दिली.
हे वाचा >> ठाण्यात रेव्ह पार्टी, १०० जण ताब्यात…
ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मध्यरात्री युनिट पाचचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. गायमूख येथील खाडी परिसरात भराव टाकून तयार केलेल्या मोकळ्या जागेत ही पार्टी सुरू होती. हा भाग कासारवडवली पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येतो.
पोलिसांनी सांगितले की, १९ ते २० वर्षांमधील तरूण मुले पार्टीत सामील होते. त्यांनी अमली पदार्थ आणि मद्याचे सेवन केले होते. तसेच मोठ्या आवाजात गाणी लावून धांगडधिंगा सुरू होता. पोलिसांनी २०० ग्रॅम गांजा, ७० ग्रॅम चरस, ०.४० ग्रॅम एलएसडी आणि एक्स्टसी गोळ्या जप्त केल्या आहेत. गुन्हे अन्वेषण विभागचे अतरिक्त आयुक्त पंजाबराव उगळे म्हणाले की, आम्ही ९० पुरूष आणि ५ महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.
ताब्यात घेतलेले तरूण ठाणे, मीरा रोड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई येथील रहिवासी आहेत. प्राथमिक चौकशीत डोंबिवलीतील रहिवासी तेजस कुणाल (२३) आणि ठाण्यातील कळवा येथे राहणाऱ्या सुजल महाजन (१९) यांच्यावर पार्टी आयोजित करण्याचा आरोप ठेवला गेला आहे. त्यांनी एक हजार रुपये प्रवेश शुल्क घेऊन सदर पार्टी आयोजित केली होती.
दोन्ही संशयित आरोपींनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोन पार्टी सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी पार्टीचा पत्ता आणि माहिती पोस्ट केली होती. या पार्टीत अमली पदार्थ कुणी पुरविले, याची माहिती पोलिस गोळा करत आहेत. भारतीय दंड संहिता आणि एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.