डोंबिवली : डोंबिवली जवळील २७ गावातील कोकणातील दोन व्यक्तिंकडून मानपाडा पोलिसांनी विक्री करण्यासाठी आणलेले हस्तीचे दोन दात रविवारी संध्याकाळी एमआयडीसी भागात जप्त केले आहेत. या दातांची बाजारातील एकूण किंमत सुमारे १० लाख रूपये आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील घारडा कंपनी परिसरात दोन इसम हस्ती दंत विक्रीसाठी येणार आहेत, अशी गुप्त माहती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून साहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, संपत फडोळ आणि पथकाने एमआयडीसीतील घारडा कंपनी भागात रविवारी संध्याकाळी सापळा लावला होता.
हेही वाचा…कोकण इतिहास परिषदेचे १४ वे राष्ट्रीय अधिवेशन, डॉ. अरविंद जामखेडकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार
रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता दोन इसम घारडा सर्कल कंपनी परिसरात दुचाकीवरून आले. ते बराच वेळ त्या भागात फिरत होते. हस्ती दंत विक्रीसाठी आलेले हेच ते इसम असावेत म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालण्याची तयारी केली. पोलिसांनी त्यांना थांंबवून आपण याठिकाणी काय करता, कोणत्या कामासाठी आला आहात, अशी विचारणा केली. त्याची उत्तरे ते देऊ शकले नाहीत. ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याजवळ हत्तीचे दोन दात आढळून आले.
हेही वाचा…Video : काटई कर्जत राज्यमार्गावर मोठी वाहतूक कोंडी; नोकरदार, दूर पल्ल्याचे प्रवासी अडकले
पोलिसांनी त्यांच्या नावाची खात्री करून त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याने गुन्हे दाखल केले. हत्तीचा एक दात ३९ सेंटीमीटर लांब, अन्य एक दात आठ सेंटीमीटर लांबीचा आहे. एकाची गोलाई २२ सेमी, दुसऱ्याची गोलाई २१ सेमी आहे. पोलिसांनी या दोघांना भारतीय नागरी संहिता सुरक्षा २०२३ चे कलम ३५(३) अन्वये नोटीस देऊन सोडून दिले आहे. हे दोन्ही २६ ते २८ वयोगटातील आहेत. यामधील एक जण रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील सिरवली गावातील, एक जण रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबवणे गावचा रहिवासी आहे. ते डोंबिवली जवळील २७ गावातील दावडी गावात तुकाराम चौकातील एका इमारतीत राहत होते. हवालदार साळवी या प्रकरणाचा तपास करत आहेत.