आई-वडील रागावतील म्हणून घर सोडून निघून गेलेल्या एका १० वर्षीय मुलाला ठाणे पोलिसांनी त्याच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप दिले. हा मुलगा ५ मार्चला जालना येथून रेल्वेगाडीत बसून कल्याण रेल्वे स्थानकात उतरला होता. त्यानंतर कल्याण येथील काही प्रवाशांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात झाली होती. सुमारे आठवड्याभराने मुलगा सुखरूप परतल्याने त्याच्या पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते.
ठाणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे अपहरण होण्याचे प्रमाण अधिक आहे. यातील बहुतांश बालके पोलिसांना आढळून येत असतात. अनेकदा त्यांच्या पालकांचा शोध लागणे कठीण झाल्यास त्यांना भिवंडी आणि उल्हासनगर येथील बालसुधारगृहात पाठविले जाते. या मुलांची त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट व्हावी यासाठी ८ मार्चला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या बाल संरक्षण कक्षाने बालसुधारगृहातील मुलांची विचारपूस करण्यास सुरूवात केली. त्यावेळी १० वर्षीय मुलाचीही पोलिसांनी माहिती घेण्यास सुरूवात केली. परंतु तो मुलगा फक्त त्याचे नाव आणि जालना येथे राहत असल्याचा उच्चार करत होता. त्याच्या आई वडिलांचेही नाव त्याला माहिती नव्हते. या मुलाला घरी सुखरूप पोहचविण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते.
मुलगा जालनाचा उच्चार करत असल्याने तो जालनात राहणारा असावा असा अंदाज पोलिसांना आला होता. बाल सरंक्षण कक्षाच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती चव्हाण यांनी या मुलाच्या कुटुंबियांचा शोध घेण्यासाठी साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय वेंगुर्लेकर, निरी बडगुजर, एस. एन. जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले. त्यानुसार पथकाने जालना येथील १८ पोलीस ठाण्यांमध्ये संपर्क साधून संबंधित नावाच्या मुलाचे अपहरण झाले आहे का, याची माहिती मिळविली. त्यावेळी कदिम या पोलीस ठाण्यात त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तेथील तपास अधिकाऱ्याचा मोबाईल क्रमांक घेऊन त्याआधारे मुलाच्या पालकांना संपर्क साधला. व्हिडीओ कॉलच्या आधारे पोलिसांनी पालकांची ओळख पटविली. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून या मुलाचा ताबा त्याच्या पालकांना देण्यात आले.
जालना येथील शास्त्रीनगर भागात हा मुलगा राहतो. ५ मार्चला तो शिकवणीला जातो असे सांगून शाळेजवळ क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. परंतु त्याला घरी परतण्यास उशीर झाला होता. त्यामुळे आई रागावेल या भितीने तो घरी परतलाच नाही. तो थेट जालना येथील रेल्वे स्थानकात गेला. त्यानंतर त्याने मुंबईच्या दिशेने येणारी एक लांबपल्ल्याची गाडी पकडली. तो कल्याण रेल्वे स्थानकात उतरला. तो एकटाच फिरत असल्याचे काही प्रवाशांनी पाहिल्यानंतर प्रवाशांनी त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी त्याची बालसुधारगृहात रवानगी केली होती.