हिवाळ्यानिमित्त रात्रभर मद्यमेजवान्या, कर्णकर्कश संगीताचा धुमाकूळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळ्याच्या हंगामात पाटर्य़ाचे बेत आखत येऊर स्वारी करणाऱ्यांची संख्या अलीकडे भलतीच वाढली असून या भागातील गाव परिसरात रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश आवाजात अक्षरश धांगडिधगा सुरू झाल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. डिजेच्या ढणढणाटात या परिसरातील शांततेचा भंग केला जात असून वन्य प्राण्यांसाठीही हा धुडगूस घातक असल्याचे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे येऊर गावात पोलीस चौकी असली तरी धनदांडग्यांच्या बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या पाटर्य़ाकडे या यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असून वन विभागास तर याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे.

दोन दिवसांपूर्वी याच भागातील एका हॉटेलमध्ये पहाटे चार वाजेपर्यंत मोठय़ा आवाजात नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू होता. काही ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना कळवूनदेखील पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शांत आणि निसर्गरम्य वातावरणामुळे येऊरकडे पर्यटकांचा कायम ओढा असतो. येऊर गावात तसेच वनीचा पाडा, भेंडीपाडा या ठिकाणी धनदांडग्याचे बंगले आणि हॉटेल आहेत. रात्रीच्या वेळी पार्टीसाठी बंगले आणि हॉटेलवर शहरातील नागरिक गर्दी करतात. मध्यरात्रीपर्यंत बेधुंद होत मोठय़ा आवाजात डिजेच्या तालावर नाचताना नागरिकांना पर्यावरणाचे भान नसते. या ठिकाणी ध्वनिप्रदूषणाचे नियम सर्रास मोडले जातात. मात्र, पोलिसांकडून काहीही कारवाई होताना दिसत नाही.

काही दिवसांपूर्वी येऊर परिसरात नवे हॉटेल उभारण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये लाइव्ह बँड सुरू करण्यात आला असून या बँडच्या आवाजाचा त्रास नागरिकांना होत असतो. दरम्यान या संदर्भात गावकऱ्यांनी येऊर गावातील पोलिसांना तक्रार करायचे ठरवल्यास निश्चित वेळी पोलीस पोहोचून कारवाई करत नाहीत, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेकदा स्मशानभूमीजवळील पोलीस चौकीला कुलूप असते, असे येऊर गावातील नागरिकांकडून सांगण्यात आले.

जंगलापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावात होणाऱ्या धिंगाण्यामुळे  प्राण्यांच्या अधिवासालादेखील धक्का पोहचतो. या संदर्भात वारंवार वनविभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. काहीच दिवसांत नवीन वर्ष स्वागत पाटर्य़ा सुरू होतील. याआधी पुरेशी सुरक्षा व्यवस्था येऊर परिसरात असायला हवी.

– रोहित जोशी, येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी

येऊर परिसरात असलेल्या पोलीस चौकीत तीन पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. येऊरमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. नागरिकांची काही तक्रार असल्यास त्यानुसार कारवाई केली जाईल.

– के. जी. गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे</strong>