ठाणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावण्यात आली असून त्यांना १५ ते १९ मे या कालावधीत विभागातून बाहेर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. या नोटीसानंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी या नोटीसांना विरोध केला आहे. पोलिसांनी आवरते घ्यावे अन्यथा ज्या क्षेत्रामध्ये पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या जात आहे. ते क्षेत्र बंद करु असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.
निवडणूकीमध्ये मतदारांवर प्रभाव पाडला जाऊ शकतो असे सांगत ठाणे पोलिसांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावली आहे. या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत पोलिसांवर आरोप केले. पदाधिकाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही पोलिसांकडून नोटीस पाठविली जात आहे. पोलिसांची वागणूक चुकीची आहे. पोलिसांनी राजकीय गुलाम बनू नये. संविधानाने नागरिकांना कोणत्याही भागात राहण्याचे अधिकार दिले आहेत. पोलिसांनी आवरते घ्यायला हवे अन्यथा आम्ही वेगळे पावले उचलू. ज्या क्षेत्रामध्ये असे प्रकार घडत आहेत. ते क्षेत्र बंद करु असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.
हेही वाचा…मोदींच्या विरोधात बोलणाऱ्या डोंबिवलीतील अपक्ष उमेदवाराला भाजप कार्यकर्त्याची धमकी
ठाण्यात मोक्काचे आरोपी पॅरोलवर बाहेर आहेत. हत्या सारखे गंभीर गुन्ह्यातील आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून ते मोकाट फिरत आहेत. त्यांची नावे माझ्याकडे आहेत. ते नागरिकांना दमदाटी करत आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांच्या नावाने नोटीसा काढाव्या असेही आव्हाड म्हणाले. ही निवडणूक लोकशाही वाचविण्यासाठी होत आहे. परंतु लोकशाहीची हत्या सुरू आहे. या प्रकाराविषयी निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात येईल. मतदान प्रचाराच्या दिवसांत पदाधिकाऱ्यांना प्रचार करण्यापासून दूर केले जात आहे, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही असेही आव्हाड म्हणाले.