ज्येष्ठ नागरिकांना अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळावी म्हणून ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्पलाइनवर सोमवारी दुपारी पहिला फोन खणखणला. पण तो उचलण्याआधीच कट झाला. पोलिसांनी त्या मिस्डकॉलची तत्काळ दखल घेऊन त्या क्रमांकावर लगेच संपर्क साधला खरा, पण तो मिस्डकॉल कोणत्याही तक्रारीसाठी नव्हता तर हेल्पलाइन खरोखरच सुरू आहे का, याची खात्री करण्यासाठी होता.

ठाणे पोलीस आणि आलेख या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली.  हा सोहळा संपल्यानंतर दुपारी दोन वाजता ठाणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील ज्येष्ठ नागरिकांच्या हेल्पलाइनवर पहिला कॉल आला. परंतु तो उचलण्याआधीच कट झाला.त्यानंतर तात्काळ  हेल्पलाइनवर आलेल्या पहिल्याच मिस्डकॉलवर नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी फोन लावला. यावेळी नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी हेल्पलाइनवर कोणत्या मदतीसाठी मिस्ड कॉल केला होता का, याची विचारणा त्या जेष्ठ नागरिकाला केली. मात्र, त्याने कोणत्याही मदतीसाठी नव्हे तर ही हेल्पलाइन खरोखरच सुरू आहे का, याची शहानिशा करण्यासाठी मिस्डकॉल केल्याचे स्पष्ट केले.

मिस्डकॉल फक्त शहानिशा करण्यासाठी

ज्येष्ठ नागरिकांसाठी ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या १०९० या हेल्पलाइन क्रमांकावर सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात दहा कॉल आले असून त्यापैकी तीन मिस्डकॉल होते. हेल्पलाइन खरेच सुरू आहे का आणि त्यावर संपर्क साधल्यानंतर पोलिसांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याची खातरजमा करणाऱ्या कॉलचे प्रमाण जास्त असून हेल्पलाइन सुरू केल्याबद्दल आभार मानणारेही कॉल होते.