ठाणे : नववर्ष स्वागतानिमित्ताने ठाणे पोलिसांनी आज, मंगळवारपासून आयुक्तालय क्षेत्रात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी पोलिसांकडून विशेष मोहीमा राबविल्या जात आहेत. तसेच, तडीपार गुंड, फरारी आरोपी, अभिलेखावरील गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत. शहरातील हॉटेल, ढाबे, लॉन्समध्ये गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी गस्ती घालत आहेत. खाडी किनारे, जेट्टी भागातही साध्या वेशातील पोलीस तैनात असतील.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात विविध हाॅटेल, ढाबे, लाॅन्समध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री आणि १ जानेवारीला पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या कालावधीत शांतता राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. त्यानुसार, गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले आहे. हाॅटेल, लाॅन्स, ढाबे यांसारख्या आस्थापनांमध्ये संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवले जाणार आहे. बसगाड्यांचे थांबे, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, तलाव परिसर, खाडी किनारी, जेट्टी या भागात गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी साध्या वेशातील महिला आणि पुरुष अधिकारी, कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी निर्भया पथके गस्ती घालणार आहेत.
हेही वाचा >>> ठाण्यातील पाणी प्रश्नावर मुंबई महापालिकेच्या हालचाली
वाहतुक पोलिसांकडून देखील शहरात तपासणी केली जाणार आहे. मद्य सेवन करून वाहने चालविणाऱ्या चालकांवर श्वास विश्लेषक यंत्राद्वारे कारवाई केली जाईल. ठाणे पोलिसांकडे ४१ श्वास विश्लेषक यंत्र आहेत. या व्यतिरिक्त वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत डासांच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक हैराण; पालिकेकडून धूर फवारणी होत नसल्याच्या तक्रारी
बंदोबस्त असा असेल
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन अपर पोलीस आयुक्त, आठ उपायुक्त, १६ साहाय्यक पोलीस आयुक्त, ११८ पोलीस निरीक्षक, ३१५ साहाय्यक पोलीस निरीक्षक णि उपनिरीक्षक, २ हजार २५३ पोलीस अमंलदार, ३७८ महिला पोलीस अंमलदार, राज्य राखीव दलाची एक तुकडी, दंगल नियंत्रण पथकाच्या तीन तुकड्या असा पोलिसांचा बंदोबस्त असेल.