किशोर कोकणे, लोकसत्ता
ठाणे : मुंबई महानगर क्षेत्रातील ठाण्यासह नवी मुंबई, वसई, मीरा-भाईंदर, पालघर या परिसरात सुरू असलेल्या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पांच्या उभारणीच्या कामांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. त्यातच येत्या काही महिन्यांत आणखी नव्या प्रकल्पांची भर पडणार आहे. या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी ठाणे पोलिसांनी नवी मुंबई, पालघर, मीरा-भाईंदर तसेच ठाणे ग्रामीण पोलिसांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन आराखडा आखण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पालघर, मीरा भाईंदर ही शहरे एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत. या शहरातून मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. या शहरांमध्ये आधीच सुरू असलेल्या वाहतूक प्रकल्पांमुळे कोंडीची समस्या निर्माण होत असतानाच, आता नवीन प्रकल्पांची कामे येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहेत. यामुळे महामुंबईची कोंडी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या सर्व शहरांतील वाहतूक पोलिसांचे नियोजन नसल्यामुळे हा गोंधळ उडत असल्याचे दिसून आले आहे. हा अनुभव लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी नवी मुंबई, पालघर, मीरा-भाईंदर, ठाणे ग्रामीण पोलिसांसोबत समन्वय ठेवून वाहतूक नियोजन आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यात प्रकल्पांची कामे सुरू होणाऱ्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविणे, एकेरी वाहतूक करणे, काही ठिकाणी वाहतुकीला प्रवेश बंद करणे, असे वाहतुकीचे नियोजन करण्यात येत आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात आठ महिन्यांत ८७ हिरकणी कक्षांची उभारणी; मध्य रेल्वेच्या स्थानकांमध्ये मागणी; पोलीस ठाण्यांमध्ये संख्या अधिक
प्रकल्पांची कामे..
वडाळा-ठाणे-गायमुख, ठाणे-भिवंडी मेट्रो या महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यापाठोपाठ आता घोडबंदर घाट नूतनीकरण, घोडबंदर तीन नवे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तसेच शीळ-कल्याण उन्नत मार्ग, कल्याण फाटा ते महापे मार्गावर बुलेट ट्रेन बोगद्याचे काम, भिवंडीतील धामणकर नाका ते बोबडे चौक, क्वार्टरगेट, दिवंगत आनंद दिघे चौकपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम, कल्याण येथील सहजानंद चौक येथे रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण, खोणी ते फॉरेस्ट नाका या मार्गिकेचा समावेश आहे.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात विविध प्राधिकरणांची कामे सुरू आहेत. येत्या काही महिन्यांत आणखी काही प्रकल्पांची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता असून ती टाळण्यासाठी पर्यायी मार्गाची चाचपणी करणे, वाहतूक साहाय्यक उपलब्ध करणे याविषयी नियोजन केले जात आहे. शहरालगतच्या इतर पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय साधून हा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
– डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा