ठाणे : भिवंडी येथे मद्यपी वाहन चालकावर कारवाई केल्याने पोलीस नाईक संतोष गोड यांना पाच जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

भिवंडी शहर वाहतुक उपशाखेचे पोलीस नाईक संतोष गोड हे सोमवारी मद्यपी चालकांविरोधात कारवाई करत होते. सोमवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास एक दुचाकी त्याठिकाणी आली. पोलिसांनी त्या दुचाकीस्वार आणि त्याच्या सहकाऱ्याला अडविले. त्यांनी मद्याचे सेवन केले आहे का, हे तपासण्यासाठी त्यांना कार्यालयात नेण्यात आले. श्वास विश्लेषक यंत्राद्वारे (ब्रेथ ॲनालायझर) तपासणी केली असता, त्यांनी मद्याचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यांची दुचाकी कल्याणनाका येथे उभी असल्याने संतोष गोड हे दुचाकीस्वाराच्या सहकाऱ्यासोबत ती दुचाकी आणण्यासाठी तेथे गेले. त्याचवेळी चारजण एका मोटारीतून त्याठिकाणी आले.

हेही वाचा…डोंबिवलीतील सर्थक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीकडून गुंतवणूकदारांची ७३ लाखाची फसवणूक

तसेच का कारवाई केली अशी विचारणा त्यांनी संतोष यांना केली. संतोष गोड यांनी त्यांना बाजूला होण्यास सांगितले. त्यावेळी झालेल्या वादातून मोटारीतील चार जण आणि दुचाकी स्वाराच्या सहकाऱ्याने संतोष गोड यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. दरम्यान, संतोष यांनी त्यांच्या सहकाऱ्याला मदतीसाठी बोलावले. तसेच मारहाणी दरम्यान संतोष यांनी मारहाण करणाऱ्यांपैकी प्रदीप कोकूल याला पकडले. संतोष यांचे सहकारी येत असताना मारहाण करणारे पळून गेले.

हेही वाचा…टिएमटीच्या ताफ्यात वर्षभरात १८६ विद्युत बसगाड्या, ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार

याप्रकरणी पाचही जणांविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्रदीप याला अटक केली आहे. तर त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

Story img Loader