मनसेचे नेते अविनाश जाधव यांना धमकी प्रकरणी ठाणे पोलिसांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनसह सात जणांना नोटीस बजावली आहे. अविनाश जाधव यांनी मुंब्रा येथील वन विभागाच्या जागेतील अनधिकृत दर्गावर कारवाई केली नाहीतर त्याशेजारी हनुमान मंदिर बांधण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जाधव यांना धमकीचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता.
हेही वाचा >>> मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे शुक्रवारपासून महिनाभर टंचाई; ठाण्यालाही फटका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिम येथील अनधिकृत दर्गा विषयीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनीही मुंब्रा शहरात वन विभागाची जागेत उभ्या असलेल्या दर्गा, मशीद आणि मजार विरोधात कारवाई करावी या मागणीसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच १५ दिवसांत कारवाई झाली नाहीतर त्याशेजारी हनुमानाचे मंदिर उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर समाजमाध्यमांवर अविनाश जाधव यांच्या छायाचित्राला फुल्ली मारलेली चित्रफीत प्रसारित झाली होती. या चित्रफीतमध्ये एक धमकीचा संदेशही होता. हा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर याप्रकरणी मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हलिमा शेख, अश्फाक सौदागर, सोहेल लतीफ मिस्त्री, कैफ रियाजुद्दीन सिद्दिकी, सिराज शेख यांना नोटीस बजावली आहे. तसेच पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोहचले असून मुख्य आरोपी व्हाट्सअप ग्रुप सदस्य जुनेद रिझवी व व्हाट्सअप ग्रुपचा प्रमुख (ॲडमिन) अश्फान जाफर सय्यद या दोघांना ४१ सीआरपीसी प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.