पोलिसांचा कुरिअर कंपन्यांना आदेश
ठाणे येथील मानपाडा तसेच कळवा परिसरात घडलेल्या दोन घटनांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने थेट कुरिअर कंपन्यांशी संपर्क साधला आहे. एखाद्या ग्राहकाला कुरिअर पोहचविण्यास जाणाऱ्या कर्मचाऱ्याची सविस्तर माहिती तसेच छायाचित्र संबंधित ग्राहकाला काही तास आधी मिळू शकेल अशी व्यवस्था कंपन्यांनी करावी, असे आदेश ठाणे पोलीस काढण्याची शक्यता आहे. यासंबंधीचा पत्रव्यवहार केला जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.
कुरिअर कंपन्यांकडून अशी व्यवस्था उभी राहिल्यास संबंधित कर्मचाऱ्याची शहानिशा ग्राहकाला सहज करता येऊ शकेल. यासाठी बँकांच्या धर्तीवर ही यंत्रणा उभारण्यात यावी, अशा स्वरूपाच्या सूचना पत्रामध्ये करण्यात येणार आहेत. ठाणे शहरातील मोठय़ा गृहसंकुलांमधील घरांमध्ये दुपारी एकटय़ा असणाऱ्या वृद्ध महिलांना हेरून अशा घरांमध्ये कुरिअर देण्याच्या बाहाण्याने शिरकाव करायचा आणि त्यानंतर महिलांवर शस्त्राने किंवा दगडाने हल्ला करून दागिने लुटून पोबारा करायचा, अशी कार्यपद्धती चोरटय़ांनी अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. कळवा आणि मानपाडा भागात अशा स्वरूपाच्या दोन घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये चोरटय़ांनी लुटीसाठी वृद्ध महिलांवर जीवघेणा हल्ला केल्याचे उघड झाले आहे.
मानपाडय़ामधील घटनेत चोरटय़ांनी कुरिअर देण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला, तर कळव्यातील घटनेत चोरटय़ाने कुरिअर बॉयचा वेश परिधान केला होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. मानपाडय़ातील घटनेमध्ये कापुरबावडी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याचा कळव्यातील घटनेमध्ये सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
कुरिअर कंपनीतील कर्मचारी घरी येणार असेल तर त्याविषयी संबंधित ग्राहक अनभिज्ञ असतात. तसेच संबंधित कंपनीकडे त्याच्याविषयी विचारपूस करण्याइतपत पुरेसा वेळही ग्राहकांकडे नसतो. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून कुरिअर कंपन्यांना पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला असून, त्यास ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दुजोरा दिला आहे. घरी कुरिअर घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याची शहानिशा संबंधित ग्राहकाला करता यावी, यासाठी बँकांच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभारावी. त्यामध्ये कुरिअर कर्मचाऱ्याचे नाव, पत्ता तसेच त्याचा फोटो आदी माहिती संबंधित ग्राहकाला काही तास आधी मिळू शकेल, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. या योजनेमुळे कुरिअर कर्मचाऱ्याची शहानिशा करणे ग्राहकांना सोपे जाईल आणि नागरिक चोरटय़ांच्या जाळ्यात अडकणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांना आगमनाची पूर्वसूचना द्या!
मानपाडय़ामधील घटनेत चोरटय़ांनी कुरिअर देण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला,
Written by दीपक मराठे
First published on: 19-09-2015 at 02:21 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane police order courier company for prior information to consumers