ठाणे – देशभरात १ जुलैपासून लागू झालेल्या नव्या कायद्यामध्ये प्राण्यांवर अनैसर्गिक अत्याचारांसाठी कोणतेही कलम नसल्यामुळे वर्तकनगरमध्ये श्वानावर झालेल्या अत्याचाराबाबत कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करायचा, याविषयी संभ्रमावस्थेत असलेल्या ठाणे पोलिसांनी अखेर याप्रकरणी जुन्याच कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. १ जुलैपुर्वीची ही घटना असल्यामुळे पोलिसांनी जुन्या कायद्याचा आधार घेऊन भारतीय दंड संहिता कलम ३७७ नुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाणे येथील वर्तकनगर परिसरातील समतानगर येथे एका बँकेबाहेरील परिसरात एका अनोळखी व्यक्तीने भटक्या मादी श्वानावर २७ जून रोजी अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

हेही वाचा >>> कल्याण : मलंगगडावरील बेकायदा ढाबे, हॉटेल्सवर कारवाई

याबाबत कॅप या प्राणीमित्र संघटनेने वर्तकनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप संघटनेने केला होता. देशभरात १ जुलैपासून नवे कायदे लागू झाले आहेत. यामध्ये पुर्वीचा भारतीय दंड संहितेमधील कलम ३७७ मध्ये पुरुष, स्त्री आणि प्राण्यांशी अनैसर्गिक संबंध ठेवल्यास आजीवन किंवा १० वर्षापर्यंत वाढू शकेल अशा कोणत्याही कारावासाची शिक्षा होती. परंतु नवीन कायद्यात अनैसर्गिक अत्याचाराबाबतचे कलमच नसल्यामुळे श्वान अत्याचाराबाबत कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करायचा असा पेच पोलिसांपुढे उभा राहिला होता. दरम्यान, ही घटना नवीन कायदे लागू होण्याआधीची म्हणजेच २७ जूनची आहे. यामुळे जुन्याच कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्राणीमित्रांनी केली होती. यासंबंधीचे वृत्त लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन ठाणे पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी प्राणी मित्रांची मागणी मान्य करत जुन्याच कायद्यानुसार म्हणजेच भारतीय दंड संहिता कलम ३७७ नुसार अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० अन्वये ११(१) (अ ) या कलमाचाही समावेश करण्यात आला आहे. एका नागरिकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.