ठाणे : थायलंड या देशातून बेकादेशीररित्या प्रवेश करून भारतात वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या तीन तरुणींची ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी थायलंडची महिला दलाल सालिका उडोम वाबनग्लाब (४४) हिला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या महिलांकडे बनावट आधारकार्ड, पॅन कार्ड आढळून आले आहेत. या कागदपत्रांच्या आधारे बँक खातेही सुरू केले होते.

त्यांना बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून देणाऱ्या बागडी मुगहेड यालाही पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. तो यमन या देशाचा रहिवासी आहे. मागील काही वर्षांपासून तो भारतात बेकायदेशिररित्या वास्तव्य करत होता. बनावट कागदपत्र बनवून देणारी टोळी कार्यरत असल्याने त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा…रसायनांच्या पिंपातील पाणी पिण्याची वेळ!

गोवा, मुंबई, लोणावळा या भागात विदेशी महिलांची फसवणूक करुन त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून थायलंड येथून आलेल्या तीन तरुणींची सुटका केली. त्या तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या सालीका हिला अटक केली. या विदेशी महिलांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड देखील आढळून आले. त्यांनी हे बनावट कागदपत्रे पुण्यात राहणाऱ्या बागडी याच्याकडून तयार करून घेतली आहे. विशेष म्हणजे, बागडी हा देखील यमन या देशाचा नागरिक आहे. त्याच्या पारपत्राची मुदत संपलेली असूनही तो पुण्यात वास्तव्य करत आहे. बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या काही टोळ्या असल्याने त्या दिशेने तपास सुरु केला आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी दिली.