शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ फेकण्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना तपासकामी हजर राहण्याचे आदेश नोटीसमधून देण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> सीएसएमटी – दिवा लोकलसाठी दिवेकरांचे हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शनिवारी भगवा सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहासाठी उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले होते. त्यांच्या वाहनांचा ताफा नितीन कंपनी परिसरात आला असता, मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याच्या दिशेने नारळ फेकले होते. या घटनेनंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी समाजमाध्यमांवर एक चित्रीकरण प्रसारित केले. तसेच हल्ला मनसेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे म्हटले होते. त्यानंतर अविनाश जाधव यांच्यासह नारळ फेकणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, नौपाडा पोलिसांनी अविनाश जाधव यांना नोटीस बजावून त्यांना तपासकामी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.