ठाणे : वयाचे १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालविणे बेकायदेशीर असतानाही मागील आठवड्याभरात १०० हून अधिक अल्पवयीन मुलांना वाहने चालविताना वाहतूक पोलिसांनी पकडले आहे. या मुलांकडे वाहतूक परवाने नव्हतेच त्यासोबतच त्यांच्याकडे दुचाकी चालविताना शिरस्त्राण नसणे, लाल सिग्नल ओलांडणे असेही उल्लंघन केले होते. सोमवारी या मुलांना त्यांच्या पालकांसोबत कापूरबावडी येथील ठाणे पोलिसांच्या मंथन सभागृहात बोलाविण्यात आले. अपघातांचे सीसीटीव्ही चित्रीकरण दाखवून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. अपघातांची भीषणता जाणून घेतल्यानंतर मुलांनी स्वत: शपथ घेऊन आपण १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर वाहन हातात घेऊ आणि नियमांचे पालन करु असे सांगितले. या समुपदेशनाच्या प्रभावामुळे मुले आणि पालकांनी वाहतूक जनजागृतीसाठी पोलिसांसोबत काम करणार असल्याचे ठरविले.
हेही वाचा >>> खळबळजनक! पाण्याच्या टाकीत आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह
ठाण्यात पालकांकडून लहान मुलांना वाहने चालविण्यास देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातांची भितीही व्यक्त करण्यात येत असते. नियमानुसार चालक १८ वर्षांचा झाल्याशिवाय वाहन चालवू शकत नाही. तसेच त्या व्यक्तीस परवानाही मिळत नसतो. असे असतानाही अनेक पालक मुलगा १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयात मुलाला जाण्यासाठी वाहन घेऊन देत असतात. त्यामुळे ठाणे पोलिसांनी मागील आठवड्याभरात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात विशेष मोहीम राबवून अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यास सुरूवात केली होती. या मुलांकडे वाहन परवाना नव्हता. त्यासोबतच त्यांनी शिरस्राण परिधाण केला नव्हता. अनेकांना वाहतूकीच्या नियमांविषयी देखील पूर्णपणे माहिती नव्हती. या मुलांवर पोलिसांनी कारवाई केली नाही. त्याऐवजी या मुलांच्या पालकांना संपर्क साधून समुपदेशन कार्यक्रमास येण्याची विनंती पोलिसांनी केली.
हेही वाचा >>> डोंबिवलीजवळ खंबाळपाडा येथे घातक रसायनाचा १० लाखाचा साठा जप्त
हा समुपदेशन कार्यक्रम सोमवारी पार पडला. १०० हून अधिक अल्पवयीन मुले आणि त्यांचे पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. वाहतूक पोलीस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी मुलांना नेमकी का कारवाई झाली याची माहिती सुरूवातीला विचारली. त्यानंतर मुलांना शहरातील भीषण अपघातांचे काही चित्रीकरण दाखविले. अपघातांचे हे चित्रीकरण पाहून अपघातामुळे कुटुंबाचे किती नुकसान होऊ शकते, याची जाणीव मुलांना झाली. तर, पालकांनाही लहान मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये याचे परिणाम काय होऊ शकतात, हे जाणून घेता आले. या उपक्रमानंतर मुलांना पोलीस अधिकाऱ्यांच्या भेट घेऊन आपण केलेल्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल खेद व्यक्त केला. पालकांनीही पुन्हा असे प्रकार होणार नाही, असे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले. तसेच पोलिसांना जनजागृतीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
करोना किंवा एखाद्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा अपघाती मृत्यूचे प्रमाण अधिक
या कार्यक्रमास सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे उपस्थित होते. करोना किंवा एखाद्या दहशतवादी हल्ल्यापेक्षा अपघाती मृत्यूचे प्रमाण हे अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मुलांना आणि पालकांना अपघात टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करुन एकप्रकारे देशसेवेचे काम करा असे आवाहन त्यांनी केले.
मुले आणि पालकांना अपघातांचे चित्रीकरण पाहून खूप प्रभाव पडला. हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक जनजागृती होईल. तसेच मुलांचे आणि पालकांचे ई-मेल खातेही आम्ही घेतले आहे. हे चित्रीकरण त्यांना पाठविण्यात येईल. हे चित्रीकरण त्यांनी त्यांच्या मित्र परिवारास पाठविले तर जनजागृती अधिक प्रभावीपणे करता येणे शक्य होईल. – डाॅ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, वाहतूक शाखा.