ठाणे : ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ गुरुवारी सकाळी तीन ते चार तासांसाठी अचानक बंद पडले. पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याने ज्या नागरिकांना आवश्यक कामासाठी पोलीस ठाण्यातील संपर्क क्रमांक आणि अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक हवे होते. त्यांना ते मिळविणे कठीण झाले. संकेतस्थळ हे वार्षिक देखभाल करण्यासाठी बंद करण्यात आले होते. असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे पोलिसांच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी आवश्यक माहिती, अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांक असतात. त्यामुळे नागरिकांना मदतीसाठी किंवा माहितीसाठी नागरिक संकेतस्थळावर भेट देत असतात. परंतु गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून या संकेस्थळ बंद पडले होते. त्यामुळे संकेतस्थळा भेट देणाऱ्या किंवा कामानिमित्ताने पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे संपर्क क्रमांक मिळू शकले नाही. अखेर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास हे संकेतस्थळ पुन्हा सुरू झाले. देखभाल दुरुस्तीसाठी ते बंद ठेवल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. परंतु त्याची पूर्वसूचना देणे आवश्यक होते, असे नागरिक म्हणत आहेत.