गेल्या काही दिवसांपासून प्रेषित मोहम्मद पैगंबर अवमान प्रकरणावरून देशभरात राजकीय वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावरून भाजपाने नुपूर शर्मा यांना निलंबित केलं असलं, तरी त्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक महत्त्वाच्या सरकारी आणि खासगी वेबसाईट्सवर हॅकर्सकडून हल्ले केले जात आहेत. त्यात आता ठाणे पोलिसांच्या वेबसाईटचा देखील समावेश झाला आहे. आज ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक करून हॅकर्सनी त्यावर धमकी देणारा संदेश पोस्ट केला आहे. या प्रकाराची ठाणे पोलिसांकडून तातडीने दखल घेण्यात आली असली, तरी देशातल्या अनेक महत्त्वाच्या वेबसाईट्स या हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. या घटनेनंतर सायबर पोलिसांनी या हॅकर्सचा शोध सुरू केलेला आहे. ‘वन बॅट सायबर टीम- इंडोनेशियन डिफेसर’ असा या हॅकर टीमचं नाव असल्याचं संदेशातून दिसत आहे.
काय म्हटलंय या संदेशात?
हॅकर्सकडून ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेल्या संदेशामध्ये जगभरातल्या मुस्लिमांची माफी मागण्याचा उल्लेख केला आहे. “हॅलो भारत सरकार, वारंवार तुम्ही इस्लाम धर्माबाबत समस्या निर्माण होतील असं वागत आहात. मला वाटतं तुम्हाला सहिष्णुता म्हणजे काय ते कळत नाही. लवकरात लवकर जगभरातल्या मुस्लिमांची माफी मागा. आमच्या प्रेषितांचा अवमान होत असताना आम्ही शांत बसून राहू शकत नाही”, असं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे.
काही वेळातच वेबसाईट पुन्हा सुरू
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या घटनेनंतर देशात मुस्सिम समाजाकडून केंद्र सरकारविरोधात टिकेची झोड उठविली जात आहे. काही मुस्लीम राष्ट्रांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. देशात नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी जोर धरत असतानाच मंगळवारी ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काही वेळानंतर ही वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात ठाणे पोलिसांच्या सायबर सेलला यश आलं असलं, तरी सतर्कतेचा उपाय म्हणून काही वेळ वेबसाईटवर तांत्रिक दुरुस्ती केली जाणार असल्याचं पोलिसांकडून कळवण्यात आलं आहे.
सोमवारी अशाच प्रकारे इस्त्रायलमधील भारतीय दूतावासाची वेबसाईट, राष्ट्रीय शेती व्यवस्थापन विभागाची वेबसाईट आणि कृषी संशोधन केंद्राची वेबसाईट देखील हॅक झाली होती. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार तब्बल ७० भारतीय वेबसाईट्सवर हे सायबर हल्ले करण्यात आले आहेत. वर्ल्ड वाइड वेबवरील डिजिटल यंत्रणेवर तसेच इंटरनेटसंदर्भातील हलचालींवर लक्ष ठेवणाऱ्या वेबॅक मशीनने आठ जून ते १२ जून दरम्यान भारतीय सरकारी साइट्स तसेच खासगी पोर्टल्स विस्कळीत झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. भारतामधील अनेक बँकांच्या वेबसाईट्स हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असा दावा सुरक्षा तज्ज्ञांनी केलाय. १३ हजारांहून अधिक सदस्य असलेल्या याच हॅकटिव्हिस्ट ग्रुपची भारतातील अनेक प्रमुख बँकांच्या वेबसाईटवर हल्ले केल्याचा दावा केला जातोय.