लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २ कोटी २५ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा एमडी हा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. हा साठा परराज्यात तयार केला जात होता. त्यानंतर तो अमली पदार्थ राज्यात तस्करांच्या माध्यमातून विक्री केला जात होता. पोलिसांनी या कारवाईत तिघांना अटक केली आहे.
इलियास कुशहाल खान (१९), अमान कमाल खान (२१) आणि सैफअली असाबउल हक खान (२५) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. शिळ – डायघर भागातील ठाकूरपाडा परिसरात एका घरामध्ये अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अमली विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, अमली पदार्थ विरोधी पथकाने ठाकूरपाडा येथे छापा टाकून सैफअली खान याला ताब्यात घेतले. त्यानंतर इलियास आणि अमान या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांना त्यांच्याकडून १ हजार १०९ ग्रॅम एमडीचा साठा आढळून आला. या गुन्ह्यात अमली पदार्थ विक्रीच्या आंतरराज्यीय टोळीचा संबंध आहे. हा अमली पदार्थ परराज्यात तयार होतो आणि त्यानंतर त्याची विक्री महाराष्ट्रात होत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे. तसेच तिघांनाही अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.