ऋषिकेश मुळे
वाहतूक कोंडी, अपघात, गुन्हे यांची माहिती देणाऱ्यांचे जाहीर आभार
शहरातील वाहतूक कोंडी, अपघात, गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना किंवा नागरी समस्या यांना ट्विटर, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवरून वाचा फोडण्याचे काम अनेक नागरिक करत असतात. अशा नागरिकांच्या दक्षतेमुळे पोलीस तसेच प्रशासकीय यंत्रणांवर कर्तव्य बजावण्याचा दबाव येतोच; पण त्याचबरोबर या यंत्रणांना मदतही होते. त्यामुळेच ठाणे पोलिसांनी अशा दक्ष नागरिकांचे ट्विटरवरून जाहीर आभार व्यक्त करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील वाहतूक कोंडी किंवा गुन्हय़ाची माहिती पोलीस नियंत्रण विभागाला कळवणाऱ्या किंवा त्याबाबतची माहिती ट्विटरवरून पोलिसांना कळवणाऱ्यांचे k#ThanksForYourSupportl अशा शब्दांत पोलीस कौतुक करत आहेत.
ठाणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येतात. मात्र अनेकदा एखादी घटना पोलिसांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागते. अशा वेळी त्या घटनेचे साक्षीदार असलेले किंवा त्याची माहिती असलेले नागरिक पोलिसांचे ‘डोळे’ बनू शकतात. हीच भावना लक्षात ठेवून ठाणे पोलिसांनी आपल्या ट्विटर खात्यावरून दक्ष नागरिकांचे आभार मानण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
पोलीस विभागाशी निगडित विविध घटनांची, नियमांची माहिती तसेच जागरूकता निर्माण करण्याचे काम ठाणे पोलिसांच्या @ThaneCityPolice या ट्विटर खात्याद्वारे करण्यात येते.
या ट्विटर खात्याचे नियंत्रण ठाणे पोलिसांचे सायबर विभाग करते. नागरिक त्यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्याद्वारे समाजातील एखादी समस्या किंवा संवेदनशील गुन्हा-घटना घडत असल्यास त्याची माहिती ठाणे पोलिसांच्या ट्विटर खात्याला टॅग करून देत असतात. समाजात सजग राहून माहिती देणाऱ्यांचे आभार मानले पाहिजेत या उद्देशातून ठाणे सायबर विभागानेही कृतज्ञता म्हणून पोलिसांना माहिती देणाऱ्या व्यक्तींचे असे सजग ट्वीट आकर्षक रूपात बनवून ते ठाणे पोलिसांच्या ट्विटर खात्यावर आभार व्यक्त करत पोस्ट करत असल्याचा नवा उपक्रम हाती घेतला आहे. #ThanksForYourSupport या हॅशटॅगचा वापर करून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
कोंडी सोडवण्यात यश
घोडबंदर येथील पातलीपाडा भागात ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता एक मालवाहू ट्रक रस्त्याकडेला पडला. या अपघातामुळे मानपाडय़ापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताच्या ठिकाणाहून जात असलेल्या राजेश भडाळकर यांनी अपघातग्रस्त ट्रकची माहिती तातडीने सर्वप्रथम ठाणे पोलिसांना दिली. याविषयीचे ट्वीट त्यांनी ठाणे पोलिसांना केले. पोलीस नियंत्रण विभागाने तात्काळ पातलीपाडा येथील वाहतूक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पातलीपाडा वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक कोंडी सोडवली. या घटनेची तातडीने माहिती कळवल्याबद्दल पोलिसांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून राजेश भडाळकर यांचे आभार मानले आहेत.
समाजमाध्यमांचा वापर नागिरक मोठय़ा संख्येने करत असतात. ट्विटरद्वारे नागरिक ही माहिती अनेकदा कळवत असतात. त्यामुळे नागरिकांना प्रोत्साहन मिळावे याकरिता. k#ThanksForYourSupportl हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
– संजय जाधव, पोलीस उपायुक्त- सायबर सेल