ठाणे – विधानसभा निवडणुकीचा हंगाम जवळ आल्याने दिवाळीतील भेटवस्तूंच्या बाजारात आतापासूनच राजकीय लगबग सुरू झाली आहे. पणत्या, उटणे, रांगोळ्या, मोती साबणापर्यंत लाखो रुपयांच्या आगाऊ मागणी राजकीय पक्षांकडून विक्रेत्यांकडे नोंदवली जाऊ लागली आहे. ठाणे, डोंबिवली, नवी मुंबईतील काही महिला बचत गट, घाऊक विक्रेते यांच्याकडे दिवाळी भेटवस्तूंची शेकडो पाकिटे नोंदवली जात असून दरवर्षीच्या तुलनेत दसऱ्यालाच दिवाळीचा बाजार तेजीत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहत आहेत. निवडणुकांची तारिख कधी निश्चित होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु, अद्याप निवडणुकांची तारिख जाहीर झालेली नसतानाही उमेदवारांकडून निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. मतदारापर्यंत कोणकोणत्या माध्यमातून पोहोचू शकतो यासाठी शक्कल लढविली जात आहे. सण-उत्सवाच्या काळात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उत्तम मार्ग मानला जातो. यासाठी कोणत्याही सणाच्या दहा ते पंधरा दिवस आधीपासून मतदारांना त्या सणाशी संबंधित असलेली भेटवस्तू उमेदवारांकडून दिली जाते.

हेही वाचा – योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखविण्याची वेळ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी दिवाळीच्या उत्सवात मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांनी तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. पणत्या, उटण, रांगोळी पुस्तके, मोती साबणासह काही फराळांचे पदार्थ अशा वस्तूंचे उमेदवारांकडून मतदारांच्या घरोघरी वाटप केले जाते. यंदा दिवाळीच्या एक ते दोन महिन्याअगोदर पासून उमेदवारांनी विक्रेत्यांकडे या वस्तूंची आगाऊ नोंद केल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील जांभळी नाका भागातील पणती विक्रेते वसीम देवरिया यांनी सांगितले की, दरवर्षी दिवाळीच्या कालावधीत उमेदवारांकडून तीन ते चार लाख पणत्यांची मागणी असते. परंतु, यंदाच्या वर्षी या मागणीत वाढ झाली असून सहा ते सात लाख पणत्यांची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी दोन महिन्याअगोदर आगाऊ नोंंदणी केली होती. चार पणत्यांचे एक पॅकेट वीस रुपयाने त्यांना दिले जाणार आहे. तर, छपाई व्यावसायिक सुशांत गुरव सांगतात की, दिवाळीत उमेदवारांकडून देण्यात येणारे उटण उमेदवाराचा फोटो असलेल्या लिफाफ्यातून दिले जाते, तो लिफाफा तसेच उंबरठा पट्टी बनविण्याचे काम गेल्यावर्षीच्या तुलनेच यंदा मोठ्याप्रमाणात मिळाले आहे. तसेच शहरांमधील महिला बचत गटांकडे दिवाळी फराळाचे काम दिले जात असल्याची माहितीही समोर आली आहे.

हेही वाचा – टिटवाळ्यात रिक्षा चालकाबरोबरच्या भांडणातून प्रवाशाचा मृत्यू

महिला बचतगटांकडे विक्रमी मागणी

ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या सारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला बचत गट कार्यरत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यान्वित करताना या बचत गटामधील यंत्रणा शासनाने उपयोगात आणल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाण्यातील जाहीर कार्यक्रमांमध्येही संपूर्ण जिल्ह्यातील महिला बचत गटांची यंत्रणा उपयोगात आणण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील काही संभाव्य उमेदवारांनी सरकार दरबारी नोंदीत असलेल्या ठराविक बचत गटांशी संपर्क साधत त्यांच्यामार्फत या वस्तूंची नोंदणी करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे आपापल्या मतदारसंघातील महिला बचतगट जोडले जाऊन दिवाळी खरेदीनिमित्त महिला मतदारांना जोडण्याचा प्रयत्नही काही उमेदवार करताना दिसत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane political leaders demand for diwali gift ssb