ठाणे – राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये ठाणे जिल्ह्यातील प्रदूषणकारी कारखान्यांची चिंताजनक माहिती समोर आली आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ८९५ कारखान्यांचा प्रदूषण निर्देशांक ६० हुन अधिक म्हणजेच प्रदूषणकारी असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारीत २ हजार ५५७ सर्वाधिक प्रदूषणाकारी कारखान्यांची संख्या आहे. शिवाय ४१ ते ५९ इतका प्रदूषण निर्देशांक असलेल्या कारखान्यांची संख्या ही तब्बल ५ हजार ४३५च्या घरात आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण – डोंबिवली, अंबरनाथ, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या या औद्योगिक क्षेत्रामुळे जिल्ह्यातील सर्वच शहरांमधील नागरी वास्तव्याचे प्रमाण वाढले. तर अनेक ठिकाणी औद्योगिक क्षेत्राची सीमा नजीकच अनेक चाळी आणि गृहसंकुले उभी राहिल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक दुर्घटनांचा फटका थेट नागरी वस्तीला होत असल्याचे विविध घटनांमधून दिसून ही आले. यामुळे जिल्ह्यातील धोकायदायक आणि प्रदुषणकारी कारखान्यांचे इतरत्र स्थलांतर करावे अशी मागणी अनेकदा नागरिकांकडून केली जाते. असे असतानाचा आता राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून जिल्ह्यातील प्रदूषणकारी कारखान्यांची चिंताजनक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता अनेकदा वाईट, अतिवाईट आणि धोकादायक पातळीवर नोंदवली गेली आहे.

कारखाने आणि वाहनांतील वायू उत्सर्जनामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे प्रदूषण उपायोजना रावविश्वात येत असल्या तरी अनेक कारखान्यांच्या मनमानी कारभारामुळे जिल्हयाच्या हवा आणि पाणी प्रदूषणात सदत वाढ होत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे कारखान्यांतून उत्सर्जित होणारा वायू आणि सोडण्यात येणारे सांडपाणी यांचे नमुने घेऊन प्रत्येक कारखान्याचा प्रदूषण निर्देशांक ठरविण्यात येतो. यानुसार जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ८९५ कारखान्यांचा प्रदूषण निर्देशांक ६० हुन अधिक म्हणजेच प्रदूषणकारी असल्याचे उघड झाले आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखानाच्या विरोधात दंडात्मक आणि कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जिल्हयातील स्थानिक प्रदूषण नियंत्रण विभाग कार्यालयातून देण्यात आली आहे.

( लाल संवर्गातील अर्थातच ६० हुन अधिक प्रदूषण निर्देशांक असलेले कारखाने )

ठाणे प्रदूषण नियंत्रण मंडळ – १४२६ कारखाने

कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ – २५५७ कारखाने

नवी मुंबई प्रदूषण नियंत्रण मंडळ – ९१२ कारखाने

कल्याण – डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात गेल्या वर्षी रासायनिक कारखान्यांच्या विविध दुर्घटना समोर आल्या होत्या. यामध्ये काही कामगार मृत्युमुखी देखील पडले होते. यामुळे येथील कारखाने दुसरीकडे स्थलांतरीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. असे असतानाच आता सर्वाधिक प्रदूषणकारी कारखान्यांची संख्या ही कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळात येत असल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे.

६० हून अधिक प्रदूषण निर्देशांक असलेल्या कारखान्यांत रासायनिक कारखाने, औषध निर्मिती कारखाने, कपडांवर प्रकिया करून रंगकाम करणाऱ्या कारखान्यांचा समावेश होतो. यात रासायनिक कारखान्याधून उत्सर्जित, होणाऱ्या वायूमुळे हवेचे प्रदूषण होते तर इलेक्ट्रॉनिक वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांतून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते.