ठाणे : वाढत्या तापमानामुळे बाजारात लिंबाची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात लिंबाच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर किरकोळात एक नग ५ रूपयांना विकला जाणारा लिंबु आता आठ ते दहा रूपयांना विक्री केला जात आहे. एप्रिल ते मे महिन्यापर्यंत दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत महाराष्ट्रातील अनेक भागातुन तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, अहमदनगर, अकोला अशा विविध ठिकाणाहून लिंबाची आवक होत आहे. या बाजार समितीतून हे लिंबु ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील किरकोळ बाजारात विक्रीसाठी जातात. नियमित बाजार समितीत अंदाजे १० ते १२ लिंबाच्या गाड्या दाखल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदल होत आहेत. कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक उन्हाळा जाणवत आहे. अशा वातावरणाने हवेतील उष्मा देखील वाढत आहे. यामुळे शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. तसेच शाकाहारी जेवण असो किंवा मांसाहारी रोजच्या जेवणात लिंबांची आवश्यकता भासते.
उन्हाता पारा वाढल्याने लिंबु सरबताची मागणीही अधिक वाढली आहे. मात्र, बाजारात सध्या लिंबाच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानामुळे घाऊक बाजारात लिंबाच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात मागील महिन्यात ५० ते ६० रूपये किलोने लिंबुची विक्री केली जात होती. सध्या बाजारात ८० ते १०० रुपये किलोनो लिंबु विकले जात आहे. परिणामी, घाऊक मध्ये दरवाढ झाल्याने किरकोळ बाजारात ही लिंबु भाव खात आहे. किरकोळ बाजारात मागील महिन्यात ५ रूपयांना लिंबु विक्री केले जात होते. सध्या किरकोळ बाजारात एक नग लिंबु आठ ते दहा रूपयांना विकला जात आहे.
प्रतिक्रिया
महाराष्ट्रामधुन २० टक्के तर दक्षिण भारतातुन ८० टक्के लिंबाची आवक होत असते. तसेच बाजारात लिंबुचे दर हे एप्रिल ते मे महिन्यापर्यंत आणखीन वाढण्याची शक्यता आहे. शंकर पिंगळे, संचालक, भाजी विभाग, वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती