लोकशाहीचा उत्सव समजला जाणाऱ्या मतदानाच्या दिवशी आज राज्यभरात अनेक ठिकाणी या मतदान प्रक्रियेला गालबोट लागल्याचे दिसून आले. ठाण्यात ईव्हीएमवर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. बसपा कार्यकर्ते सुनिल खांबे यांनी मतदान केंद्रात आल्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्याच्या टेबलवर असेलली  शाईची बॉटल हिसकावून घेत त्यातील शाई ईव्हीएमवर फेकली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मतदान कक्षातील सर्वच अधिकारी कर्मचारी गोंधळले. यानंतर मतदनाकक्षाबाहेर असलेल्या पोलिसांनी तात्काळ मतदान कक्षात धाव घेत सुनिल खांबे यांना ताब्यात घेतले.

पोलिस पकडून नेत असताना देखील सुनिल खांबे ईव्हीएम मशीन मुर्दाबादच्या घोषणा देत होते. तसेच, ईव्हीएम मशीन नही चलेगा, ईव्हीएम मशीन जलादो.. आम्हाला ईव्हीएम मशीन नाही पाहीजे. हा आमचा वैचारिक मार्ग आहे, आम्हाला लोकशाहीने अधिकार दिला आहे. ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे. सर्व पक्षांना गुंडाळल्या जात आहे, हा केवळ ईव्हीएमचा खेळ आहे. ईव्हीएममुळे देशाला आणि लोकशाहीला धोका झालेला आहे. म्हणून मला फासावर चढवलं तरी चालेल, परंतु या ईव्हीएमचा हा खेळ आम्ही सहन करणार नाही.ईव्हीएमचा खेळ आम्ही हाणून पाडणार. लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल, तर ईव्हीएम बंद झालं पाहिजे, असं सुनिल खांबे म्हणत होते. यानंतर पोलीस सुनिल खांबे यांना जीपमध्ये टाकून मतदान केंद्रावरून रवाना झाले.

विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत.