ठाणे : नर्सिंग (परिचारिका) अभ्यासक्रमाच्या नावाखाली २३ विद्यार्थ्यांची ३३ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना निकालपत्र दिली नाही. तसेच विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र देखील परत केलेली नाहीत. याप्रकरणी उडाण स्कील इन्स्टिट्यूट या संस्थेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एका इमारतीमध्ये २०२१ मध्ये उडाण स्कील इन्स्टिट्यूट ही संस्था सुरू होती. या संस्थेचे मालक राहुल झा, सौरभ सांदिलिया यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे. विद्यार्थ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, इयत्ता १२ वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थांनी विविध अभ्यासक्रमासाठी शोध सुरु केला होता. त्यावेळी त्यांना समाजमाध्यमावर उडाण स्कील इन्स्टिट्यूट या संस्थेची जाहिरात दिसली. अनेकांनी या संस्थेत परिचारिका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असल्याचे भासवून विद्यार्थ्यांकडून संस्थेने लाखो रुपयांचे शैक्षणिक शुल्क घेतले होते. या अभ्यासक्रमात सरकारी प्रमाणपत्र दिले जाते असेही सांगितले होते.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचे १० वी आणि १२ वी इयत्ता उत्तीर्णचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला संस्थेने स्वत:कडे ठेवले होते. मे २०२४ मध्ये विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाची परिक्षा दिली. या परिक्षेचा निकाल डिसेंबर २०२४ मध्ये लागणार असल्याचे सांगितले होते. डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्यांना परिक्षेचा निकाल हाती मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत संस्थेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोदंणीसाठी २० हजार रुपये लागतील असे सांगितले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी २० हजार रुपये संस्थेतील अधिकारी सौरभ याच्या बँक खात्यात जमा केले. परंतु त्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही. याबबत विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

फसवणूक होत असल्याने काही विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्यालयात जाऊन विचारणा करण्याचा निर्णय घेतला. परंतु संस्थेला टाळे लागले होते. विद्यार्थ्यांनी संस्थेतील अधिकारी सौरभ सांदिलिया याला संपर्क साधला. त्याचा मोबाईल क्रमांक बंद होता. त्यानंतर त्यांनी संस्थेचा मालक राहुल झा याला संपर्क केला. परंतु त्याचाही मोबाईल क्रमांक बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत २३ विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केली असून त्यांची ३३ लाख १७ हजार ८५० रुपयांना फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.