ठाणे : सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ओळख असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाला मध्य रेल्वेचा स्वच्छ स्थानक पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रेल्वेचे अधिकारी स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. परंतु स्थानकातील स्वच्छतेची परिस्थिती प्रत्यक्षात वेगळीच असल्याचे दिसून येत आहे. स्थानकाच्या तिकीट घराजवळ झोपलेले मजूर आणि भिक्षेकरू, फलाट आणि जिन्यांवर पडलेला कचरा, प्रतिक्षालयामागील बाजूस गुटखा आणि पानाच्या मारलेल्या पिचकाऱ्या, असे चित्र दिसून येते. शिवाय, स्थानक परिसरात भटक्या श्वानांचा मुक्तपणे संचार सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वच्छ स्थानकाचा पुरस्कार मिळालेल्या ठाणे स्थानकात अस्वच्छतेचे चित्र दिसून येत असतानाही हा पुरस्कार कोणत्या निकषाच्या आधारे देण्यात आला, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला पाच ते सहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या तुलनेत फलाटांची रुंदी कमी असल्याने दरररोज स्थानकात मोठी गर्दी दिसू लागली आहे. स्थानकाच्या फलाटांवर खासगी संस्थेच्या माध्यमातून सफाई करण्यात येते. अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून ही सफाई करण्यात येते. मध्य रेल्वेच्या मार्गावर एकूण ४६६ रेल्वे स्थानक आहेत. या स्थानकावरील स्वच्छतेची पाहाणी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली असून त्याआधारे प्रशासनाने ठाणे स्थानक हे स्वच्छ स्थानक असल्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी स्थानकातील परिस्थिती मात्र वेगळीच असून स्थानकात अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसून येत आहे.
हेही वाचा : धूर फवारणीत बदलापूर पालिकेची ८१ लाखांची फसवणूक; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कंपनीवर गुन्हा दाखल
ठाणे स्थानकातील फलाट, जिन्यांवर कागदाचे बोळे, खाद्य पदार्थांच्या प्लास्टिक आवरणे पडलेली असल्याचे चित्र गुरूवारी दिसून आले. पश्चिमेकडील तिकीट घराजवळ भटके श्वान झोपलेले दिसून आले. तसेच रात्रीच्या वेळेत अनेकदा गर्दुल्ल्यांचाही वावर याठिकाणी असतो. नव्याने बनविण्यात आलेल्या फलाट क्रमांक दोन येथील प्रतिक्षालयामागे मोठ्याप्रमाणात गुटखा आणि पानाच्या पिचकाऱ्या मारून भिंत रंगविण्यात आल्याचे दिसून आले. याचठिकाणी बांधकामाचा राडारोडाही पडलेला आहे. काही स्टाॅलधारक त्यांना दिलेल्या स्टाॅलपेक्षाही अतिरिक्त जागा अडवून विक्रीचे सामान ठेवत आहेत.
हेही वाचा : डोंबिवलीत उमेशनगरमध्ये जलवाहिनीच्या व्हाॅल्व्हवर झाकण नसल्याने अपघात
फलाटावरील छताच्या पत्र्यांवर काही प्रवाशी गुटखा आणि पान खाऊन थुंकत असून यामुळे हे पत्रे लाल झालेले आहेत. छतावर गुटख्याच्या पुड्या, सुकलेल्या झाडाच्या फांद्या पडलेल्या आहेत. तर पूर्वेच्या तिकीट खिडक्यांजवळही काही कामगार, भिक्षेकरू दुपारच्या वेळेत झापलेले दिसून आले. यामुळे प्रवाशांना ये-जा करताना अडथळा होत होता. असे चित्र स्थानकात असताना कोणत्या निकषाच्या आधारे ठाणे रेल्वे स्थानकाला स्वच्छ स्थानक पुरस्कार मिळाला, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांना संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.