ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात मद्य पिऊन धिंगाणा घालणाऱ्या महिला आणि एका व्यक्तीविरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलाट क्रमांक १० अ येथे दोघेही मद्य पिऊन आरडाओरड करत होते. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १० अ येथून ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी, पनवेल आणि नेरुळच्या दिशेने उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतुक होत असते. ठाणे, मुलुंड, भांडूप, कल्याण, कर्जत, कसारा भागातील लोखो नोकरदार नवी मुंबईत कामानिमित्ताने जाण्यासाठी ठाणे स्थानकातून प्रवास करतात. त्यामुळे दररोज लाखो प्रवासी वाहतुक करत असतात. २५ फेब्रुवारीला रात्री ८ वाजताच्या सुमारास २३ वर्षीय मुलगा आणि एक ५१ वर्षीय महिला मद्य पिऊन १० अ फलाटावर मुंबई दिशेकडील पादचारी पूलाखाली उभे राहून आरडाओरड करत होते. दोघेही ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरातील रहिवासी आहेत. याबाबतची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्या शरिरात मद्याचे प्रमाण असल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यानुसार, त्यांच्याविरोधात आता ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८१ (१) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा ११२ आणि ११७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.