ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय प्रवासात मागील काही वर्षांपासून अपंगांच्या डब्यात प्रवास करण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील तीन वर्षांत ठाणे रेल्वे स्थानकातून नऊ हजार ३६२ प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई या वर्षी म्हणजेच १ जानेवारी ते १३ डिसेंबर या कालावधीत झाली असून या प्रवाशांची संख्या तीन हजार ८७० इतकी आहे. असे असले तरी कारवाई होत असतानाही अपंगांच्या डब्यातील प्रवास कमी होत नसल्याचे चित्र आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपंगांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये अपंगांना डबा आरक्षित केलेला असतो. परंतु या डब्यांमध्ये धडधाकड प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. रात्री आणि सकाळच्या वेळेत प्रवास करताना नोकरदारांची लोकलमध्ये गर्दी होत असते. ही गर्दी टाळण्यासाठी अपंग नसलेले प्रवासी थेट अपंग डब्यांमध्ये प्रवेश करून प्रवास करतात. अनेकदा हे प्रवासी त्यांच्या आसनाचाही ताबा घेत असतात. त्यामुळे अपंग प्रवासी हैराण झाले आहेत. मागील तीन वर्षांत म्हणजेच, २०२२ ते २०२४ या कालावधीत नऊ हजार ३६२ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. या प्रवाशांवर कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येते. त्यानंतर न्यायालय ठरवेल त्या प्रमाणे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.
हेही वाचा : घाटकोपर – डोंबिवली प्रवासात रिक्षेत विसरलेला बारा लाखांचा सोन्याचा ऐवज महिलेला परत
ठाणे रेल्वे स्थानकामध्ये २०२२ या वर्षात २ हजार ५१५ प्रवाशांवर कारवाई झाली. तर २०२३ या वर्षी २ हजार ९७७ प्रवाशांवर कारवाई झाली आहे. सर्वाधिक कारवाई २०२४ या वर्षामध्ये झाली आहे. १ जानेवारी ते १३ डिसेंबर २०२४ या कालवधीत ३ हजार ८७० प्रवाशांवर कारवाई झाली आहे.
प्रवाशांनी अपंगांच्या डब्यात प्रवेश करून प्रवास करू नये. अन्यथा त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. अपंगांच्या डब्यात घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही अभियानही सुरू केले आहे. – सुरेंद्र कुमार कोस्टा, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, ठाणे स्थानक.
हेही वाचा : ठाणे : उड्डाणपूलाखाली बेकायदा वाहनतळासह टपऱ्या
यावर्षी १ जानेवारी ते ३० जून या कालावधीत २ हजार ६१ प्रवाशांवर कारवाई झाली. तर १ जुलै ते १३ डिसेंबर या कालावधीत १ हजार ८०९ प्रवाशांवर कारवाई झाली आहे.