रेल्वे-महापालिकेच्या संयुक्त भागीदारीतून प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव
ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीला पर्याय म्हणून ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान उपनगरीय रेल्वेसेवेला विस्तारीत थांबा उभारण्यासाठीच्या हालचालींना वेग आला असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल आठवडय़ाभरात सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी सायंकाळी दिले. ठाणे मनोरुग्णालयाच्या जागेवर उभारण्यात येणारे हे विस्तारीत स्थानक रेल्वे आणि महापालिकेच्या संयुक्त भागीदारीतून आकारास यावे, असा प्रस्तावही पालिकेने रेल्वे प्रशासनासमोर ठेवला आहे.
ठाण्यातील नागरी संशोधन केंद्रात खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत विस्तारित स्थानकाबाबत चर्चा करण्यात आली. ठाणे स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या सहा लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहराच्या सीमा घोडबंदर मार्गावरून अगदी भाईंदपर्यंत विस्तारत असून या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या गृहप्रकल्पांमधून लाखोच्या संख्येने रहिवासी राहावयास येत आहेत. या प्रवाशांना सोयीचे जावे आणि रेल्वे स्थानकावरील भार कमी व्हावा यासाठी विस्तारित स्थानकाचा पर्याय पुढे आणण्यात आला होता. कोपरीलगत असलेल्या ठाणे मनोरुग्णालयाच्या जागेवर या स्थानकाची उभारणी केली जावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव आहे. परंतु, राज्य सरकारकडून या जमिनीच्या हस्तांतरणाचा मुद्दा गेली अनेक वर्ष भिजत ठेवण्यात आला आहे. मध्यंतरी रेल्वेने केलेल्या एका सर्वेक्षणात पूर्व द्रुतगती महामार्गावर मनोरुग्णालयास लागून उन्नत रेल्वे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला होता. यासाठी मनोरुग्णालयाची आठ एकर जागा संपादित करण्याचा प्रस्ताव आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत पुढील आखणी कशी असावी यासंबंधी चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये विस्तारित रेल्वे स्थानकाच्या सीमांकनाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेने या विस्तारित रेल्वे स्थानकासाठी जे सीमांकन प्रस्तावित केले होते त्यास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत सहमती दर्शवली आहे, अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डापुढे सादर करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पासाठी मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एम. के. गुप्ता यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून या प्रकल्पाचा आढावा घेतला जात आहे, असे विचारे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेच्या वतीने मे. बालाजी रेल रोड सिस्टम लिमिटेड या सल्लागार संस्थेकडून तयार केला जात असून हा अहवाल एका आठवडय़ात तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी दिले. हा अहवाल तयार झाल्यानंतर पुढील आठवडय़ात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
लोकसहभागातून सदर प्रकल्प राबविताना मिळणारा प्रतिसाद आणि लागणारा कालावधी लक्षात घेऊन महापालिका आणि रेल्वेने संयुक्तपणे यासंबंधी पावले उचलावीत असे ठरले. यासंबंधीचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता अनिल पाटील, कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा