ठाणे : मध्य रेल्वेचे अनेकदा रखडलेले वेळापत्रक, गर्दीमुळे होणारे प्रवाशांचे हाल यामुळे प्रवासी त्रस्त असताना आता ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाने भर उन्हाळ्यात छताच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे फलाट क्रमांक पाच आणि सहा क्रमांकाच्या फलाटावरील अनेक ठिकाणी छत गायब झाले आहे. त्याचा फटका आता प्रवाशांना सहन करावा लागत आहे. भर उन्हात प्रवाशांना रेल्वेगाड्यांच्या प्रतिक्षेत उभे राहावे लागत आहे. दुपारच्या वेळेत ऊन वाढल्यास अक्षरश: घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. तसेच या उन्हामुळे शरिरातील ऊर्जाही कमी होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

ठाणे शहरातून मुंबईत कामानिमित्ताने जाणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ठाणे स्थानकातून लाखो प्रवासी दिवसाला वाहतुक करतात. तसेच ठाणे शहरातील वागळे इस्टेट, घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग आहेत.त्यामुळे विविध शहरातून दररोज रेल्वे मार्गे नोकरदार ठाणे शहरात ये-जा करतात. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहा वरून प्रवाशांच्या वाहतुकीचे प्रमाण अधिक आहे. फलाट क्रमांक पाचवरुन मुंबईहून कसारा, कर्जत, कल्याणच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जलद उपनगरीय रेल्वेगाड्या थांबतात. तर फलाट क्रमांक सहावरुन मुंबईच्या दिशेने जलद उपनगरीय रेल्वेगाड्या धावतात. याच फलाटांवरुन लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचीही वाहतुक होते. त्यामुळे परराज्यात जाणारे प्रवासी देखील येथूनच प्रवास करतात. त्यामुळे स्थानकातील इतर फलाटांच्या तुलनेत या फलाटावरुन प्रवाशांची संख्या अधिक असते.

या फलाटावर गर्दी वाढत असल्याने काही महिन्यांपूर्वीच रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक पाचचे काही मीटर रुंदीकरण केले होते. रुंदी वाढल्याने छताचा भाग अपूरा पडत होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात बांबूच्या साहाय्याने ताडपत्रीचे छत उभारले होते. आता या ठिकाणी नव्याने छत उभारणीचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. परंतु भर उन्हात ही कामे सुरू झाल्याने प्रवाशाकंडून संताप व्यक्त केला जात आहे. फलाट क्रमांक पाच आणि सहावरील बहुतांश भागात छत उपलब्ध नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. भर उन्हामध्ये प्रवाशांना उभे राहून रेल्वेगाड्यांची प्रतिक्षा करावी लागत आहे. तर काही प्रवासी ज्या ठिकाणी सावली उपलब्ध होईल तिथे आडोशाला उभे राहत असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे महिला, बालक आणि वृद्ध प्रवाशांचे सर्वाधिक हाल होतात. गर्दीतील प्रवास त्यात उन्हाचे चटके यामुळे प्रवासा दरम्यान शरिरातील ऊर्जा निघून जाते असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

रेल्वे प्रशासनाने दुरुस्ती किंवा इतर कामे कोणत्या ऋतूमध्ये करावी पाहावे. मुंबईचे तापमान वाढत आहे. उन्हाळ्यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करणे अपेक्षित आहे – लता अरगडे, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.

फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरण झाले होते. त्यामुळे या फलाटावरील छत बसविण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. – पी.डी. पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Story img Loader