ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरण सुरू झाले असून रेल्वे रूळ हलविण्याचे महत्वाचे कार्य पूर्ण झाले आहे. आता या फलाटाची रुंदी वाढविण्यासाठी सिमेंटच्या विटा बसविण्याचे कार्य सुरू झाले आहे. ७५० विटा या फलाटासाठी लागणार आहेत. शनिवारी सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारी शेवटच्या टप्प्यातील काम सुरू होईल. त्यानंतर प्रवाशांना हा फलाट उपलब्ध होईल.
मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. फलाट क्रमांक पाच आणि सहा येथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांना थांबा आहे. येथे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात. त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होत असते. अनेकदा गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरण करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा…ठाणे स्थानक परिसराने घेतला मोकळा श्वास
रेल्वेचे सुमारे ५५० ते ६०० अधिकारी, कर्मचारी, मजूरांनी यंत्रणांच्या साहाय्याने अवघ्या आठ तासांत रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविले. तसेच दुपारी १२ वाजताच्या सुमारास फलाटाच्या रुंदीकरणाच्या कामासही सुरूवात झाली. फलाटाला सुमारे ७५० सिमेंटच्या विटा बसविल्या जाणार आहेत. ही कामे शनिवार सायंकाळ पर्यंत सुरू राहतील. तर रविवारी या फलाटाच्या सुशोभिकरणाची कामे केली जाणार आहे.
© The Indian Express (P) Ltd