ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे कार्य मध्य रेल्वेकडून सुरू होते. दुपारी १२.३० वाजता रेल्वे रूळ सुस्थितीत असल्याचा अहवाल रेल्वेच्या अभियंत्यांनी दिल्यानंतर दुपारी एक वाजताच्या सुमारास येथून पहिली रेल्वेगाडी कसाऱ्याच्या दिशेने रवाना झाली. त्यानंतर आसनगाव रेल्वेगाडी फलाटावर आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी या गाडीला फुलांच्या माळा चढवून रेल्वेगाडीतील प्रवाशांचे आणि मोटरमनचे स्वागत केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सहा लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. फलाट क्रमांक पाच आणि सहा येथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांना थांबा आहे. येथे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात. त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होत असते. अनेकदा गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक पाचचे रुंदीकरण करण्यास सुरूवात झाली होती. रेल्वेचे सुमारे ५५० ते ६०० अधिकारी, कर्मचारी, मजूरांनी यंत्रणांच्या साहाय्याने शुक्रवारी अवघ्या आठ तासांत रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत केले होते. शनिवारी येथील फलाटाची रुंदी वाढविण्यात आली. तसेच उर्वरित तांत्रिक कामे करण्यात आली. ही कामे रविवारी दुपारी ३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी ७.३० वाजेपर्यंत सर्व कामे पूर्ण केली.

हेही वाचा – ठाणे : जड-अवजड वाहनांमुळे घोडबंदर मार्गावर कोंडी, एक किलोमीटर अंतर गाठण्यासाठी दोन तास

स्थलांतरीत रेल्वे रुळांवरून होणारी वाहतूक सुस्थितीत आहे का? याची चाचणी सकाळी ९.३० वाजता करण्यात आली. त्यासाठी एक रिकामी रेल्वेगाडी या रुळांवरून सोडण्यात आली. रेल्वेगाडी कुठे-कुठे धिमी झाली. याची तपासणी करून तेथील भागामध्ये काही बदल करण्यात आले. त्यानंतर पुन्हा येथून रेल्वेगाडी चालवून येथील चाचणी यशस्वी केली. रेल्वेच्या अभियंत्यांनी दुपारी १२.३० वाजता हे रेल्वे रूळ सुस्थितीत असल्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर फलाट क्रमांक पाच प्रवाशांसाठी सुरू झाला. दुपारी १ वाजताच्या सुमारास येथून कसारा रेल्वेगाडी थांबून पुढे गेली. त्यानंतर आसनगाव रेल्वेगाडी आली. या रेल्वेगाडीला रेल्वेच्या कामगारांनी फुलांचे तोरण चढविले. तसेच मोटरमन आणि प्रवाशांना कामगारांनी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील पहिली चाचणी यशस्वी

फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी पाचच्या छताचे काम रेल्वेकडून पूर्ण झाले नाही. या कामासाठी फलाटावर खांब उभारावे लागणार आहेत. तसेच ५०० मीटर लांब छत तयार करावे लागणार आहे. यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना काही दिवस उन्हाचा मारा सहन करावा लागणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane railway traffic started from platform number five welcoming motormen and passengers by garlanding the locals ssb