ठाणे : ठाण्यातील नागरिकांना वैचारिक ज्ञानाने दरवर्षी समृद्ध करित असणाऱ्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेला बुधवार, ८ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वी जनशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे वंशज तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे व्याख्यान असणार आहे. तर, इतर दिवशी प्राची शेवगांवकर, सद्गुरू श्री वेणाभारती महाराज, वैद्य सुविनय दामले, ॲड अश्विनी उपाध्याय, सारंग दर्शने यांची विविध विषयांवरील व्याख्याने असणार आहेत. या व्याख्यानमालेच्या समारोपाला गायिका आरती अंकलीकर – टिकेकर यांची मुलाखत असणार आहे. ही व्याख्यानमाला बुधवार, ८ जानेवारीपासून मंगळवार, १४ जानेवारी पर्यंत दररोज रात्री ८ वाजता नौपाडा येथील सरस्वती क्रिडा संकुलाच्या पटांगणात होणार आहे.
ठाण्यातील रसिक रामभाऊ म्हाळगी या व्याख्यानमालेची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा या व्याख्यानमालेचे यंदा ३९ वे वर्ष आहे. ही व्याख्यानमाला बौद्धिक विचारांनी समृद्ध करित असते. यंदाही विविध तज्ज्ञ वक्ते विविध विषयांवर आपली मते मांडणार आहेत. गुरूवार, ९ जानेवारीला ‘हवामान बदल – जबाबदारीतून संधीकडे’ या विषयावर आंतरराष्ट्रीय पर्यावरण शोधक प्राची शेवगांवकर यांचे व्याख्यान असणार आहे. तर ‘तणावमुक्त जीवनाची गुरूकिल्ली’ यावर शुक्रवार, १० जानेवारीला सद्गुरू वेणाभारती महाराज मार्गदर्शन करणार आहेत. शनिवार, ११ जानेवारी रोजी ‘आजीबाईचा बटवा’ या विषयावर निरोगी कानमंत्र देण्यासाठी वैद्य सुविनय दामले उपस्थित राहणार आहे. ‘कायदा वक्फ बोर्डाचा’ या वैचारिक विषयावर आपले मत मांडण्यासाठी रविवार, १२ जानेवारीला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे ॲड. पारिजात पांडे यांची उपस्थिती असणार आहे. तर ‘अटलजींचा वसा आणि वारसा या विषयावर सोमवारी, १३ जानेवारीला लेखक सारंग दर्शने यांचे व्याख्यान असणार आहे.
हेही वाचा…पाटलांचा बैलगाडा, बदलापुरात होतोय राडा, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून आमदार, माजी नगराध्यक्ष भिडले
रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी मंगळवार, १४ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर – टिकेकर यांची प्रकट मुलाखत माधुरी ताम्हाणे घेणार आहेत. रसिकांसाठी ही व्याख्यानमाला विनामूल्य असून या व्याख्यानमालेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समिती, ठाणे या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.