ठाणे : वाहतुक नियमांचे उल्लंघन करुन दंड प्रलंबित ठेवणाऱ्या चालकांना लोकअदालतीच्या माध्यमातून नोटीस पाठवून त्यांच्याकडून एक कोटी ५८ लाख ७६ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अनेक वाहन चालकांनी दंडाची रक्कम प्रलंबित ठेवली होती. या कारवाईद्वारे १० हजार ११७ खटले निकाली निघाले आहेत.
ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहर येतात. या क्षेत्रात ठाणे वाहतुक पोलिसांचे एकूण १७ कक्ष आहेत. या १७ कक्षांद्वारे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. इ-चलान या यंत्रणाद्वारे कारवाई केली जात असल्याने जे वाहन चालक वाहतुक नियमांचे उल्लंघन करतात. त्यांच्या वाहनाचे छायाचित्र काढून त्यांच्या मोबाईलवर संदेशाद्वारे कारवाईची माहिती पाठविली जाते. त्यामुळे अनेकदा वाहन चालक दंडाची रक्कम प्रलंबित ठेवतात. अनेक वाहन चालकांवर हजारो रुपयांचा थकित दंड प्रलंबित आहे. अशा दंड प्रलंबित ठेवणाऱ्या वाहन चालकांविरोधात लोक अदालतद्वारे नोटीस पाठविण्यात येते. तसेच पोलिसांकडूनही थकित दंड भरल्यास त्यांना दंडाच्या रकमेमध्ये काहीशी सूट मिळत असल्याबाबत जनजागृती केली जाते. २२ मार्चला झालेल्या लोक अदालतीमध्ये ठाणे पोलिसांनी लोक अदालतीमध्ये १० हजार ११७ खटले समोर आणले. हे सर्व खटले निकाली काढले असून या माध्यमातून एक कोटी ५८ लाख ७६ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक दंडाची वसूली ठाणे शहरातून झालेली आहे. ठाणे ते दिवा या शहरात ८० लाखाहून अधिकची रक्कम राज्य सरकारकडे जमा झाली आहे. या लोक अदालतीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहीते यांनी वाहतुक शाखा आणि न्यायालयामध्ये समन्वय साधला.
कुठे किती दंड वसूली
शहरे – भरलेली रक्कम (रुपयांत)
ठाणे ते दिवा – ८०७४९००
भिवंडी – १७३८७००
डोंबिवली – कल्याण – ४६२६७००
उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर – १४३६०००
एकूण – १,५८,७६,३००
लोक अदालतीच्या माध्यमातून एक कोटी ७६ लाख ३०० रुपये इतक्या दंडाची रक्कम सरकारकडे जमा झाली आहे. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.