ठाणे :- कधी काळी आयुष्य हरवलेलं होत, चेहऱ्यावर गंभीर शांतता, मनात गोंधळ, विसरलेली नाती पण ठाणे जिल्हा मनोरुग्णालयाने त्या विस्कटलेल्या आयुष्याला पुन्हा आकार दिला. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत तब्बल २ हजार मानसिक रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहे. यामुळे या रुग्णांना एक नवे आयुष्य मिळाले असून या मानसिक आजाराच्या धूसर धुक्यात हरवलेल्या रूग्णांसाठी ठाणे जिल्ह्यातील मनोरुग्णालय एक दीपस्तंभ ठरू लागले आहे.
उतरत्या वयात कमी झालेली स्मरणशक्ती, एखाद्या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने झालेला मानसिक परिणाम, कौटुंबिक वादातून अथवा वैयक्तिक कारणातून झालेला मानसिक आघात, नैराश्य यांसारख्या अनेक मानसिक आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांवर ठाणे जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार केले जातात. सुमारे १२४ वर्षांपूर्वी अर्थातच १९०१ मध्ये हे रुग्णालय सुरू झाले होते. मुंबई, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील विविध भागातून मनोरुग्णांना उपचारासाठी घेऊन त्यांचे नातेवाईक ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात येत असतात. याच बरोबर परराज्यातून अनेक रुग्ण रेल्वेगाडी किंवा इतर मार्गाने वाट चूकून येतात. हे रुग्ण रेल्वे स्थानक परिसरात आढळून आल्यानंतर त्यांना देखील रुग्णालयात आणले जाते. त्यामुळे राज्यातील इतर तीन प्रादेशिक मनोरुग्णालयापेक्षा ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांचे प्रमाणही खूप असते.
सुमारे ५० एकरमध्ये हे रुग्णालये आहे. विविध विभाग, महिला, पुरुष, वयोवृध्द तसेच आपली मानसिक स्थिती पूर्ण गमावलेले रुग्ण, यांसाठी विशिष्ठ विभाग, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था, मैदान, बगीचे असा मोठा आवर या रुग्णालयाचा आहे. यामुळे राज्यातील कायम गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या ठाणे शहरात हे रुग्णालय असून ही या ठिकाणी मानसिक रुग्णांना मोकळ्या वातावरणात वावरणे शक्य होते.
औषध उपचारांसमवेतच मानवी प्रेमाचा स्पर्श
मानसिक रुग्णांना पूर्णतः बरे होण्यासाठी औषध उपचारांसह मानवी प्रेमाचा स्पर्श देखील तितकाच महत्त्वाचा असतो. याची पुरेपूर काळजी ठिकाणी रुग्णालय व्यवस्थापनाकडून घेतली जाते. वेळोवेळी मिळणारे उपचार, उत्तम जेवण, नियमित समुपदेशन, अनेक उपक्रम यांमुळे या रुग्णांना सतत खेळीमेळीचे वातावरण या ठिकाणी अनुभवण्यास मिळते. यामुळे रुग्णांना बरे होण्यास कमी कालावधी लागतो. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत रुग्णालयातून २०३७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामध्ये १ हजार ३८० महिला आणि ६५७ पुरुष रुग्ण आहेत.
यामध्ये ३८ रुग्णांच्या नातेवाईकांचा पोलिसांच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्यात आले. यामध्ये २१ महाराष्ट्रतील आहेत तर १७ रुग्ण हे परराज्यातील आहेत. यामध्ये १ रुग्ण हा नेपाळ येथील असल्याने पोलिसांच्या मदतीने त्याला घरी सोडण्यात आले आहे.
निराधारांना आधार
ज्या मानसिक रुग्णांना कोणीही नाही अशा ९६ रुग्णांचे तळोजा, कर्जत आणि भिवंडी येथील पुनर्वसन केंद्रांमध्ये पाठविण्यात आले.
मानसिक रुग्णासाठी तणावमुक्त उपचार हीच महत्वाची उपचार पद्धती असते. याच हेतूने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय रुग्णांची सेवा करत असते. सर्व वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी यांच्या प्रयत्नांना यश आल्याने गेल्या एक वर्षाच्या कालावधीत २०३७ रुग्णांना पूर्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
डॉ.नेताजी मुळीक, वैद्यकीय अधिक्षक, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय