ठाणे : यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच गेल्या दोन महिन्यांत ठाणे जिल्ह्यात मलेरिया आणि डेंग्यु अशा आजारांची साथ पसरली असून गेल्या दोन महिन्यात मलेरियाचे ६५३ तर, डेंग्युचे ५०५ रुग्ण आढळून आलेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात मलेरिया, डेंग्युसोबतच अतिसाराचे १०६, स्वाईन फ्लु २७ आणि लेप्टो ६ रुग्ण आढळून आलेले आहेत. यामुळे जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाळ्याच्या काळात मलेरिया, अतिसार, डेंग्यु, स्वाईन फ्लू, लेप्टो असे साथीचे आजार डोके वर काढतात. या आजारांची साथ पसरू नये म्हणून आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येते. यामध्ये भिती पत्रकाद्वारे साथीचे आजार रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी, याविषयी जनजागृती करण्यात येते. त्याचबरोबर शहरात धूर आणि औषध फवारणी करण्यात येते. घरोघरी साठवणूक ठेवलेल्या पाण्याची तपासणी करण्यात येते. त्यात डासांच्या आळ्या आढळून आल्यास त्या नष्ट करण्यात येतात. यंदाही अशा उपाययोजना राबविण्यात आल्या असल्या तरी जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा…मध्य रेल्वे मार्गावर आज ‘वातानुकूलित’ऐवजी ‘विनावातानुकूलित’ लोकल, प्रवाशांच्या गोंधळात भर

ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात २ लाख ६ हजार २८८ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. यामध्ये ६५३ रुग्णांना मलेरिया झाल्याचे तपासणीत समोर आले. यातील जुलै महिन्यात २८४ तर, ऑगस्ट महिन्यात ३६९ रुग्ण आढळून आलेले आहेत. तर, १ हजार ४८६ डेंग्यु संशयित रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. यामध्ये ५०५ रुग्णांना डेंग्युची लागण झाल्याचे उघडकीस आले. यामध्ये जुलै महिन्यात २५० तर, ऑगस्ट महिन्यात २५५ रुग्ण आढळून आलेले आहेत. रुग्ण संख्येची आकडेवारी लक्षात घेता ऑगस्ट महिन्यात मलेरिया आणि डेंग्यु रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा…बदलापूर: वामन म्हात्रे यांचा जामीन अर्ज फेटाळला

ठाणे महापालिका क्षेत्रात साथीचे आजार

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन महिन्यात २४९ मलेरियाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. या रुग्ण संख्येत जुलै महिन्यापासून वाढ होऊ लागली असून जुलै महिन्यात ९३ तर, ऑगस्ट महिन्यात १३५ रुग्ण आढळून आलेले आहेत. अतिसाराचे रुग्ण जुन महिन्यात २१२, जुलै महिन्यात ३३६ आणि ऑगस्ट महिन्यात १०६ रुग्ण आढळले आहेत. डेंग्युचे जुन महिन्यात ९, जुलै महिन्यात ३१ आणि ऑगस्ट ३८ रुग्ण आढळून आलेले आहेत. कावीळचे जुलै महिन्यात ३ रुग्ण आढळून आलेले असून ऑगस्ट महिन्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. स्वाईन फ्लुचे जुन महिन्यात ८, जुलै महिन्यात १३३ आणि ऑगस्ट महिन्यात २७ रुग्ण आढळून आलेले आहेत. लेप्टोचे जून महिन्यात १, जुलै महिन्यात २३ आणि ऑगस्ट महिन्यात ६ रुग्ण आढळून आलेले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane reports surge in epidemic diseases during monsoon 653 malaria 505 dengue cases detected psg