ठाण्यातील तरुणाईला परावृत्त करण्यासाठी चळवळीचा निर्धार; वाढत्या व्यसनाबद्दल चिंता

घोडबंदर तसेच आसपासच्या परिसरात अमली पदार्थविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच ठाण्याचे निवासी असलेल्या मराठमोळय़ा कलाकारांनी याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता रवी जाधव यांनी समाजमाध्यमांवरून या मुद्दय़ाला हात घातल्यानंतर अन्य कलाकारांनीही या प्रश्नी एकजुटीने चळवळ उभारण्याचा विचार पुढे आणला आहे. विशेष म्हणजे, याच मुद्दय़ावर शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका परिषा सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रहिवासी संघटनांची तक्रारपत्रे वाचून दाखवली होती. त्यानंतरही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

ठाण्यातील घोडबंदर, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोज, उपवन तलाव, डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहासमोरील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात तसेच काही चौकांत तरुणांचे घोळके अमली पदार्थाचे सेवन करत असल्याची बाब रवी जाधव यांनी फेसबुकवरून प्रसारित केलेल्या एका पोस्टमधून उघड केली आहे. ठाणे शहरातील या उच्चभ्रू वस्तीच्या पट्टय़ात अमली पदार्थाचा व्यापार बिनदिक्कत सुरू असल्याच्या तक्रारी आधीपासूनच येत आहेत. हीच बाब जाधव यांनी अधोरेखित केली. गेल्या दोन वर्षांपासून तरुणवर्गावर चढलेला हा ‘अमल’ अस्वस्थ करत असल्याचे सांगत या मुद्दय़ावर पालकांना जागृत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शाळकरी मुलेही व्यसनाधीन होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सुजाण पालकांनी याविरोधात एकत्र येऊन एक कट्टा तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. जाधव यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजवरून प्रसारित केलेल्या पोस्टने ठाण्यात राहणाऱ्या अन्य मराठी कलावंतांचेही लक्ष वेधले आहे. काही कलावंतांनी याविरोधात चळवळ हाती घेण्याचा निर्णयही बोलून दाखवला.

ठाण्यात वास्तव्य करणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करून लहान शाळकरी मुलांनाही अत्यंत स्वस्तात अमली पदार्थ मिळत असल्याचे म्हटले. शहरातील बिघडत चाललेल्या वातावरणावर मात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दिग्दर्शक विजू माने यांनीही या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते उन्मेष जोशी यांनी याविरोधात सर्वानी एकत्र येऊन शाळा, महाविद्यालये, सोसायटय़ांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले. दरम्यान, याबाबत संपर्क साधला असता, पोलिसांनी वेळोवेळी कारवाई होत असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांना कोठेही अमली पदार्थाची विक्री वा सेवन करणारे आढळल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले.

ठाण्यातील नाक्यांवर तरुण मुले-मुली खुलेआम अमली पदार्थ सेवन करताना दिसत असून त्यांच्यावर ठाणे पोलिसांनी बारीक लक्ष ठेवून कारवाई करण्याची गरज आहे. धोकादायक पदार्थ विकणाऱ्यांच्या टोळक्याला कसलाही धाक नसल्याचे आश्चर्य वाटते. चायनीज पदार्थाचे विक्रेते, सिग्नलवर फुगे, खेळणी विकणारेही यात सहभागी असल्याचे समजते. हुक्का पार्लरमध्ये तर १५-१६ वर्षांची मुले दिसून येतात. नागरिकांनी यासाठी पुढे येऊन अशा घोळक्यांचे फोटो काढून पोलिसांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. अन्यथा हे विष सहजपणे कोणाच्याही घरी पोहोचेल. या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम व सुजाण पालकांचा कट्टा शहरामध्ये सुरू होण्याची हीच खरी वेळ आहे.

– रवी जाधव, दिग्दर्शक

Story img Loader