ठाणे – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा सण आहे. यादिवशी दागिने, वस्तू, वाहन, गृह खरेदी करण्यास नागरिक पसंती देतात. या शुभ मुहूर्तावर ठाणेकरांनी यंदा गृह खरेदीला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. ठाणे शहरातील एक हजाराहून अधिक नागरिकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नविन घरांचा ताबा घेतला. तर, ५०० हून अधिक घरांची विक्री झाल्याची माहिती क्रेडाई एमसीएचआयच्या वतीने देण्यात आली.
हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळीचा पाडवा हे साडेतीन मुहूर्त आहेत. या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे म्हणजे शुभ मानले जाते. विशेष करुन यादिवशी अनेकजण दागिने, गृह आणि वाहन खरेदी करण्यास प्राधान्य देताना दिसून येतात. यंदाही गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरातील सराफाच्या दुकानात तसेच वाहनांच्या दुकानात ग्राहकांची खरेदीसाठी सकाळ पासून गर्दी दिसून आली. तर, या शुभ मूहूर्ताला गृह खरेदीस देखील नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिसल्याचे दिसून आले. क्रेडाई एमसीएचआय या संस्थेकडून आलेल्या अहवालानुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एक हजारहून अधिक कुटूंबांनी त्यांच्या हक्काच्या घरांचा ताबा घेतला आहे. तर, क्रेडाई एमसीएचआय ठाणे सदस्यांच्या मार्फत ५०० हून अधिक घरांची विक्री केल्याची माहिती क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. घोडबंदर, पोखरण दोन आणि ठाणे शहरातील गृह प्रकल्पांमधील ही घरे असल्याचेही त्यांनी सांगितले.