ठाणे – जिल्ह्यात सध्या आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे सध्या प्रवेश घेतले जात असून जिल्ह्यात प्रतिक्षा यादीतील २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ५७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. उद्या म्हणजेच १ एप्रिल प्रवेशासाठी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांनी लवकरात लवकर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
वंचित, दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या २५ टक्के आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी १४ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातून आरटीई प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या २५ हजार ७७४ अर्जांपैकी १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड करण्यात आली. परंतू, यामधून केवळ ६ हजार ७२१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले. त्यानंतर, प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. त्यानुसार, पहिल्या प्रतिक्षा यादीमधून २ हजार ७०५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २४ मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू, २४ मार्च पर्यंत केवळ ६३६ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले.
प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चित करण्यासाठी १ एप्रिल पर्यंत मुदत वाढ देण्यात आली. मात्र, असे असले तरी ३१ मार्च दुपार पर्यंत केवळ १ हजार ५६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल्याची माहिती आरटीई च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अद्याप प्रतिक्षा यादीतील १ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. उद्या, प्रवेशाचा शेवटचा दिवस असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया बाकी आहे त्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.