शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थन करणारे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले असून ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांची उपनेते पदी नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांची शहरप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्याची बातमी आली होती. त्यानंतर शिंदे गटाने त्यांची तातडीने शहरप्रमुख पदावर नियुक्ती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई – ठाण्यात संततधार ; सखलभागात पाणी साचण्यास सुरुवात , लोकल संथगतीने सुरू

प्रकाश पाटील हे गेली १२ वर्षे शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुखपदी कार्यरत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य बँक असलेल्या गोपीनाथ पाटील पारसिक बँकेच्या उपाध्यक्षपदी देखील पाटील कार्यरत आहेत. पाटील यांचे ग्रामीण भागात मोठे वर्चस्व असून त्यांचा या भागात दबदबा आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेत उभी फूट पडली. शहरी भागांमधील जिल्ह्याप्रमुख तसेच शहर प्रमुखांसह अनेक नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले. त्यावेळेस प्रकाश पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागात फूट पडली तरी ग्रामीण भागात शिवसेनेत फारशी फूट पडली नव्हती. शिवसेनेतील बंडखोरीननंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात म्हणजेच शहापूर आणि भिवंडी भागात निष्ठा यात्रा काढली होती. या यात्रेचे नियोजन पाटील यांनी केले होते. परंतु वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसोबत फारसे पटत नसल्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामीण जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. अखेर पाटील यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून युती सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी रात्री ३ वाजता त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र सुपूर्त करण्यात आले. पाटील यांच्या संघटन कौश्यल्याचा नक्कीच पक्ष संघटनेसाठी राज्यभर नक्कीच उपयोग होईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी शिवसेना (शिंदे गट ) सचिव संजय मोरे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार हेदेखील उपस्थित होते.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपले

गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांची शहरप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्याची बातमी आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी वामन म्हात्रे यांची देखील बदलापूर शहरप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा बदलापूर अंबरनाथ परिसरात शिवसेनेला अधिक बळ देण्यासाठी नक्कीच होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.या पक्षप्रवेशाननंतर बदलापुरात ठाकरे गट अधिक सक्रीय झाला आहे. त्यात माजी नगरसेवक किंवा दिग्गज लोक नाहीत. पण जे आहेत त्यांनी दबावतंत्र वापरून आता म्हात्रेंची हकालपट्टी कागदोपत्री करून घेतली आहे. लवकरच नवीन शहरप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर करू शकतात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane rural deputy district chief prakash patil joins shinde group amy