ठाणे : ग्रामीण भागात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अनेकदा तक्रारदाराला कैक मैल अंतर पार करून पोलीस ठाणे गाठावे लागते. अनेकदा गुन्हा दाखल होतो असे होत नाही. त्यामुळे तक्रारदाराला हताश होऊन पुन्हा गावाकडे परतावे लागते. त्या तक्रारदाराचा संपूर्ण दिवस या प्रक्रियेत वाया जातो. त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता ‘आपले पोलीस, ठाणे ग्रामीण पोलीस’ हा उपक्रम राबविला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून एक वाहन तयार करण्यात आले आहे. हे वाहन गाव-पाड्यात जाऊन तेथे कायद्याविषयी जनजागृती करणार असून एखाद्या व्यक्तीला तक्रार द्यायची असल्यास त्या व्यक्तीला थेट या वाहनातील पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तक्रार दाखल करता येणार आहे. या उपक्रमामुळे गाव पाड्यात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ठाणे जिल्ह्यात ठाणे ग्रामीण पोलिसांच्या क्षेत्रात भिवंडी तालुका, गणेशपुरी, पडघा, कल्याण तालुका, कसारा, किन्हवली, कुळगाव, मुरबाड, शहापूर, टोकवडे आणि वाशिंद पोलीस ठाणे येतात. यातील अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दी मोठ्या आहेत. अनेक गाव पाडे पोलीस ठाण्यापासून पाच किलोमीटरहून अधिक अंतरावर आहे. त्यामुळे एखादा गुन्हा घडल्यास त्याबाबत तक्रार देण्यासाठी संबंधित तक्रारदाराला पोलीस ठाणे गाठणे खर्चिक ठरते. तसेच, काही महत्त्वाच्या कामासाठी देखील नागरिक पोलीस ठाण्यात जात असतात. पोलीस ठाणे जास्त अंतरावर असल्याने आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार, सात कलमी कार्यक्रमांतर्गत ठाणे ग्रामीण पोलिसांनी आता ‘आपले पोलीस, ठाणे ग्रामीण पोलीस’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण पोलिसांनी एक वाहन तयार केले आहे. हे वाहन पोलीस ठाण्यापासून लांब असलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाव पाडे, दुर्गम भागात फिरणार आहे. या वाहनामध्ये तक्रारी नोंदविण्यासाठी कक्ष तयार करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीला काही तक्रार द्यायची असल्यास तो व्यक्ती तेथे जाऊन तक्रार देऊ शकतो. तसेच भारतीय न्याय संहिताच्या कलमांबद्दल माहिती देखील या वाहनातून दिली जाणार आहे. यासह बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी किंवा असा प्रकार घडल्यास त्याबाबतचे कलम कोणते याचीही माहिती दिली जाणार आहे.ग्रामीण क्षेत्रात बाल विवाहाचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण रोखणे, पोलीस मदत क्रमांक, सायबर फसवणूक रोखण्यासाठी उपाय, अमली पदार्थाविरोधात जनजागृती अशा विविध प्रकरणात जनजागृती करण्यासाठी या वाहनावर एक एलईडी स्क्रिन बसविण्यात आली आहे. त्या स्क्रिनवर याबाबतची माहिती दिली जाणार आहे.

नागरिकांवर होणाऱ्या अन्यायविरोधात तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे यासाठी हा उपक्रम आहे. या वाहनामध्ये साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, दोन महिला अंलदार आणि दोन पुरूष अंमलदार असणार आहे. तसेच या वाहनाच्या माध्यमातून महिला, बालक सुरक्षितता, भारतीय न्याय संहिताच्या कलमांची माहिती, गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजनांबाबतची जनजागृती केली जाणार आहे. – डाॅ. डी.एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण पोलीस.