ठाणे: ग्रामीण भागातील चर पद्धतीने मैला व्यवस्थापन करण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेने आठ ते नऊ महिन्यांपूर्वी घेतला होता. या प्रकल्पात ठाणे जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील १४५ गावांचा समावेश करण्यात आला होता. स्वारस्याची अभिव्यक्ती प्रक्रिया राबवत याद्वारे पुण्यातील एका संस्थेला हे काम देण्यात आले होते. परंतु काम देण्यात आलेली संस्थाच अंतर्गत वादामुळे अर्थिक डबघाईला आल्याने प्रकल्प रखडला आहे. यामुळे जिल्हा परिषदेने आता नवीन संस्था नेमण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
शहरी भागात पालिका, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सांडपाणी, मैला व्यवस्थापन यांसारखे प्रकल्प मोठ्या स्तरावर यांत्रिकरणाच्या सहाय्याने राबविण्यात येतात. परंतु शहरांच्या वेशीवर असलेल्या गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा असे अनेक प्रश्न प्रकर्षाने दिसून येतात. यामध्ये मैला व्यवस्थापन हा प्रश्न गेल्या काही वर्षात ग्रामीण भागात गंभीर बनला आहे. खासगी शौचालयांमध्ये खोदलेले शोषखड्डे काही काळानंतर मैल्याने भरतात. यानंतर ग्रामीण भागातील कुटुंबे येथील शौचालयाचा वापर बंद करतात. हा प्रश्न अनेक शौचालयांच्या बाबतीत होतो. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार ग्रामीण मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात येणार होता.
हेही वाचा… मध्यरेल्वेच्या दिरंगाई कारभारामुळे प्रवासी हैराण
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर कल्याण तालुक्यातील गावांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मदतीने हा प्रयोग राबवला जाणार होता. त्यासाठी संस्थांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती मागवण्यात आली होती. यानुसार पुणे येथील क्रेडोस इन्फ्रा या कंपनीला हे काम देण्यात आले होते. परंतु कंपनीतील अंतर्गत वादामुळे मागील काही महिन्यात कंपनी डबघाईला गेली. यामुळे हा प्रकल्प उभारण्यात मोठी दिरंगाई झाली आहे. यामुळे राज्यासाठी एक दिशादर्शक ठरणार हा प्रकल्प संस्थेच्या वादामुळे रखडून राहिला आहे.
प्रकल्प काय होता ?
मैला गाळावर प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थापन करणे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट होते. ग्रामीण भागाशेजारील स्थानिक स्वराज्य संस्थामधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे सहकार्य घेतले जाणार होते. तर ग्रामीण भागातील मैला प्रक्रिया केंद्रात आणून त्यात प्रक्रिया केली जाणार होती. तर ज्या भागात मैला वाहतूक शक्य नसेल त्या ठिकाणी चर पद्धतीने प्रक्रियेचा अवलंब केला जाणार होता. या प्रकल्पात ठाणे जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील १४५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या कामांना लवकरच सुरुवात केली जाणार आहे. तर कल्याण तालुक्यातील एक समूह प्रकल्प लवकरच उभा केला जाणार होता.
मैला व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी नव्याने संस्था नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही कालावधीत हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल. – पंडित राठोड, प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद, ठाणे