ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून बँकांच्या शाखा-शाखांमध्ये जाऊन मराठी भाषेच्या वापराविषयी मनसेकडून आंदोलन केले जात होते. हे आंदोलन आता मनसेकडून थांबविण्यात आले आहे. परंतु ठाण्यातील एका शाळकरी मुलाने थेट रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) पत्रव्यवहार करुन राज्यातील सर्वच सार्वजनिक बँका, वित्तीय सेवा पुरविणाऱ्या संस्थांसह इतर बँकांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचे आणि मराठी भाषा येत नसलेल्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषा शिकण्यास आणि लिहीण्यास प्रशिक्षण, प्रोत्साहन देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.

मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वी मनसेने बँकांच्या शाखांमध्ये शिरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. काही ठिकाणी वादाचे प्रसंग देखील उद्भवले होते. अखेर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेला आंदोलनाच्या तलवारी म्यान कराव्या लागल्या. आरबीआयकडे पाठपुरावा करणे या ठिकाणी अपेक्षित होते अशी चर्चा होती. त्यातच ठाण्यातील एका शाळकरी मुलाने थेट आरबीआयला पत्रव्यवहार केला. या पत्रात त्याने म्हटले की, मी अथर्व जयेश वगळ , ठाणे शहरात राहणारा बालकलाकार आहे. मी माझ्या शालेय शिक्षणासोबतच मराठी आणि हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन मालिका आणि जाहिराती, अभिनय क्षेत्रातही काम करून विविध सामाजिक विषयांवर उपक्रम ही राबवित आहे. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया ठाणे येथे इयत्ता १० वीत शिक्षण घेत आहे. मराठी भाषा ही आमची ‘मातृभाषा’ आहे. ती आमची संस्कृती व परंपरा , मायबोली आहे तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या सुंदर मायमराठीला ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा’ ही मिळालेला आहे. ही सर्व मराठी भाषिकांसाठी व महाराष्ट्रासाठी फारच अभिमानास्पद बाब आहे. गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा. देशाच्या इतिहासात मराठी भाषेचे योगदान खुप मोलाचे , महत्वाचे व मोठे आहे.

आपल्या महाराष्ट्रात अंदाजे आठ कोटी पेक्षा अधिक मराठी भाषिक लोक वास्तव्यास आहेत व परदेशात वास्तव्यास आहेत ते तर वेगळेच त्यांची मातृभाषा व बोली भाषा ही मराठीचं आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ही मराठी भाषेचा वापर हा सर्वच सरकारी, निमसरकारी आणि महानगर पालिकेच्या कार्यालयामध्ये अनिवार्य केला आहे. मराठी भाषा बोलणे आणि व्यवहार मराठी भाषेतून करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ही मोठे पाऊल उचलले आहे. आजही खेडोपाडी, गावावगावा पासून ते शहरी भागात अनेक ठिकाणी मराठी भाषेचा वापर व आर्थिक व्यवहारही मराठी भाषेच्या माध्यमातूनच जास्त प्रमाणात केले जातात .

आमच्या मातृभाषा मराठी चे महत्व व अस्तित्व टिकवण्यासाठी मराठीत बोलणे व व्यवहार करणे आत्या आवश्यक आहे. त्यामुळेच आपल्या महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक क्षेत्रातील बँका , सहकारी क्षेत्रातील बँका , विविध विक्तिय संस्था व पतसंस्था , शेड्यूल बँकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आपण ‘मराठी’ भाषेचा वापर करण्यास बोलण्यास कृपया ‘अनिवार्य’ करावे, ज्या बँक कर्मचाऱ्यांना व विविध क्षेत्रातील सहकारी संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषा येत नसेल त्यांना शिकण्यास प्रोत्साहित करावे , संबंधित बँक अधिकारी व इतर विक्तीय संस्था आणि विभाग यांना तसे निर्देश द्यावेत. मराठी भाषा शिकण्यास प्राधान्य द्यावे, त्याना मार्गदर्शन देऊन मराठी शिकण्यास मदत करावी जेणे करून मराठी भाषेचा वापर व प्रसार होण्यास मदत होईल. तसेच ज्यांना आपल्या मराठी भाषेव्यतिरिक्त हिंदी, इंग्रजी व इतर भाषा बोलता व लिहता येत नाही , समजत नाही त्यांना बँकेत जाऊन बोलणे व आर्थिक व्यवहार करणे अधिक सोयीचे होईल. असे त्याने पत्रात नमूद केले आहे. हे पत्र त्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या कार्यालयालाही दिले आहे.