ठाणे : नवी मुंबई येथील न्यू हॉरीझॉन पब्लिक स्कुल या शाळेच्या बसगाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना तीन हात नाका परिसरात सोमवारी दुपारी उघडकीस आली. या बसगाडीमध्ये पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसह एकूण १८ जण होते. वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत या बसगाडीतील मुलांना बाहेर काढले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने बसगाडीला लागलेली आग विजविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
नवी मुंबई येथील ऐरोली भागात न्यू हॉरीझॉन पब्लिक स्कुल आहे. या शाळेची बसगाडी विद्यार्थ्यांना घेऊन ठाण्याहून नवी मुंबईच्या दिशेने जात होती. त्यावेळी बसगाडीमध्ये पहिली ते तिसरीच्या वर्गात शिकणारे एकूण १६ विद्यार्थी आणि वाहन चालक, त्याचा मदतनीस असे एकूण १८ जण होते. ही बसगाडी तीन हात नाका येथे आली असता बसगाडीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाला. त्यामुळे बसगाडीतून धूर येऊ लागला. त्याचवेळी परिसरात ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर होते. त्यांनी तात्काळ बसगाडीमधील सर्वांना बाहेर काढले. तसेच बसगाडी रस्त्याच्या बाजूला केली. पोलिसांनी तात्काळ ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आग विजवली. ही आग किरकोळ स्वरूपातील होती. परंतु आगीचा भडका उडण्यापूर्वीच पोलिसांनी प्रसंगावधान दाखविल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.