भगवान मंडलिक
कल्याण: ठाणे आणि अहमदनगर जिल्हे जोडणारा महत्वाच्या महामार्ग बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मागील अनेक वर्षाचा हा रखडलेला रस्ता पूर्ण झाला तर मुंबईतून नाशिकमार्गे किंवा माळशेज घाटातून अहमदनगरला जाण्याऐवजी प्रवाशांना मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील शहापूर येथून धसई, शेणवे, डोळखांब ते अकोले मार्गे थेट अहमदनगर जिल्ह्यात जाता येणार आहे. या मधल्या रस्त्यामुळे नगर जिल्ह्यात जाण्यासाठीचा ६० किमीचा वळसा कमी होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
या रस्ते कामासाठी प्रकल्प सल्लागार नेमणे, वास्तवदर्शी अहवाल तयार करुन मग त्याप्रमाणे या महामार्गाची आखणी, निधीची तरतूद आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात या प्रक्रिया पार पाडल्यानंतर ठाणे-नगर हे दोन जिल्हे जोडणारा महत्वाचा रस्ता मार्गी लागणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागातील एका उच्चपदस्थाने सांगितले.
मुंबई, ठाणे जिल्ह्यातून अहमदनगर येथे जाण्यासाठी प्रवासी कसारा घाटातून नाशिकमार्गे किंवा काही प्रवासी कल्याण-मुरबाड, माळशेज घाट-जुन्नर-आळेफाटा मार्गे नगरचा प्रवास करतात. कसारा घाटातून जाताना प्रवाशांना ६० किमीचा वळसा घ्यावा लागतो. तसाच वळसा माळशेज घाटमार्गे पडतो. प्रवाशांचा त्रास वाचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागील अनेक वर्ष प्रस्तावित असलेला, पण अडगळीत असलेला शहापूर-नगर महामार्ग हाती घेण्याचे आदेश बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कसा असेल रस्ता
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून भातसा नदी-धसई-शेणवा-डोळखांब-आज्याचा डोंगर(घाटघर वीज प्रकल्प)-भंडारदरा-राजूर-अकोले-संगमनेर असा १२० किमीचा हा रस्ता आहे. डोळखांब जवळील सह्याद्री डोंगर रांगेतील गांडुळवाड, तलवाडा, हिंगळूद, मेट, चोंढे घाट मार्गातून हा रस्ता डोंगर माथ्यावरील घाटघर, भंडारदरा, शेंडी, मुरशेत या डोंगर दुर्गम भागातून प्रस्तावित आहे. शहापूर ते चोंढे हा सुमारे ४० किमीचा दुपदरी रस्ता अनेक वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याला जोड देऊन पदर वाढविण्याची प्रक्रिया होण्याची शक्यता बांधकाम विभागाच्या उच्चपदस्थाने व्यक्त केली. सह्याद्री डोंगर रांगेतील शेंडी ते घाटघर हा घाटमाथ्याचा भाग आहे. नवीन महामार्गामुळे चोंढे खुर्द (मेट) ते घाटघर (नगर) हे घाट मार्गातील चार किमीचे अंतर प्रवाशांना २५ मिनिटात कापणे शक्य होणार आहे. या रस्ते मार्गात सहा किमीचा भाग वनविभागाच्या अखत्यारित आहे. मागील वीस वर्षापासून शहापूर, अकोले विभागाचे आमदार या रस्त्याची मागणी करत आहेत. आठ वर्षापूर्वी या रस्त्याचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. आता नव्याने या रस्त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहे. सुमारे एक कोटी ७५ लाखाचा निधी या कामासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.
पर्यटन स्थळ विकास
या महामार्गामुळे शहापूर(चोंढे), अकोले सहयाद्री डोंगर रांगेतील चोंढे धरण, घाटघर धरण, कळसुबाई शिखर, सांधण व्हॅली, अलंग-कुलंग किल्ले, ढेहणे गाव हद्दीतील दंडकारण्य भागातील वाल्मिक ऋषी समाधी परिसर, कोकण कडे धबधबे या पर्यटन, तीर्थस्थळांचा विकास होण्यास मदत होणार आहे. मुंबई, ठाणे भागातून शिर्डी येथे पायी जाणाऱ्या भक्तांना पाच दिवसात पोहचणे शक्य होणार आहे. असे चांग्याचा पाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी सांगितले.
“ठाणे-अहमदनगर हे दोन जिल्हे जोडणारा महत्वाचा मार्ग मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या रस्त्यामुळे मुंबई, ठाण्यातील प्रवाशांचा नाशिकमार्गे जाण्याचा ६० किमी फेरा कमी होणार आहे. या मार्गाचा काही भाग सह्याद्री डोंगर रांगेतून आहे.”