ठाणे : शांतीनगर येथून मोटारसायकल चोरी केलेल्या चोरट्याचा माग ठाणे पोलिसांच्या भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक काढत होते. त्याचदरम्यान तो भिवंडीत ताडी पिण्यासाठी येताच पथकाने तिथे जाऊन त्याला अटक केली. मोक्का आणि जबरी चोरीच्या १८ गुन्ह्यांमध्ये तो फरारी असल्याची माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे.
भिवंडी येथील शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मोटारसायकल चोरीचे गुन्हे वाढू लागल्याने ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनावणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज केदार आणि त्यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला होता.
हेही वाचा – डोंबिवलीत काटई रस्त्यावर झाडांची रोपे विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हा
पोलिसांची पथके मोटारसायक चोराचा माग काढत असतानाच, त्यांना तो भिवंडीतील एका ठिकाणी ताडी पिण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. याआधारे त्यांनी त्या परिसरात सापळा रचला. मोटारसायकल चोरणारा व्यक्ती तिथे येताच पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. तो २४ वर्षाचा तरुण आहे. चौकशीदरम्यान त्याने ४ सोनसाखळी आणि ३ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच तो महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम ( मोक्का ) आणि जबरी चोरीच्या १८ गुन्ह्यांमध्ये फरारी असल्याची माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २ लाख ६५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.