कचरा, सांडपाण्यामुळे जलप्रदूषण, काठाला झोपडय़ांचा विळखा
‘तलावांचे शहर’ अशी ख्याती असलेल्या ठाण्यातील अस्तित्वात असलेल्या तलावांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले जात असले तरी सिद्धेश्वर या मोठय़ा तलावाकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. अनधिकृत झोपडय़ांचा वेढा पडलेल्या या तलावात सर्रास कचरा टाकला जात आहे. सांडपाणीही थेट तलावात सोडले जात असल्याने येथील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे खोपट परिसरातील महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला हा तलाव नामशेष होण्याची भीती परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
मध्यंतरीच्या काळात शहरातील तलावांचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेने विशेष योजना जाहीर केली. मात्र त्यात सिद्धेश्वर तलावाचा समावेश नव्हता. खोपट परिसरातील हाऊस नगर भागात असणाऱ्या या तलावाला लागूनच मोठी झोपडपट्टी आहे. झोपडपट्टी इतकी मोठी आहे की, त्याच्यामुळे पूर्ण तलावच झाकून गेला आहे. झोपडपट्टीतील रहिवासी त्यांचे सांडपाणी, कचरा थेट तलावात टाकतात. त्यामुळे तलाव कमालीचा प्रदूषित झाला आहे. पाण्यावर शेवाळ पसरले असून दुर्गंधी पसरली आहे. थोडक्यात एके काळी शहरातील एक रम्य ठिकाण असलेला सिद्धेश्वर आता अखेरच्या घटका मोजत आहे.
उद्यानाची दुरवस्था
सिद्धेश्वर तलावाला लागूनच महापालिकेचे वेदूताई परुळेकर हे उद्यान आहे. या उद्यानात सायंकाळच्या वेळेस अनेक वयोवृद्ध नागरिक चालण्यासाठी येतात. संध्याकाळी परिसरातील लहान मुले खेळण्यासाठी या उद्यानात येतात. उद्यानात आत प्रवेश केल्यावर उद्यानाच्या आवारात शेवटच्या टोकाला सिद्धेश्वर तलाव आहे. या ठिकाणी महापालिका नौकानयन सुरूकरणार होती. महापालिकेने पुढील दृष्टीने या भागात तलावाजवळ फूड स्टॉलसाठी असणारे दोन लोखंडी मनोरे बांधलेले आहेत. मात्र हे फूड स्टॉल गेल्या काही महिन्यांपासून त्याच अवस्थेत पडून आहेत. याचा गैरफायदा घेत मद्यपी व गर्दुल्ल्यांनी येथे आपला अड्डा बनवला आहे. उद्यानात शेवटच्या कोपऱ्यात असणाऱ्या जागेत, फूड स्टॉलच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर कचरा साठला आहे. त्याला लागूनच तलाव आहे. संरक्षक भिंत नसल्याने लहान मुले तलावात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यातून इथे दुर्घटना होण्याचीही शक्यता आहे.
सिद्धेश्वर तलावाची लवकरात लवकर पाहाणी करून त्या ठिकाणी तलावात झालेला कचरा रोखण्यासाठी नक्की प्रयत्न केले जातील. उद्यानाची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.
– संदीप माळवी (ठाणे महानगरपालिका सहआयुक्त)