ठाणे जिल्ह्य़ातील स्क्वॉश रॅकेट संघाने चमकदार कामगिरी करून महाराष्ट्र राज्य स्क्वॉश रॅकेट ओव्हर ऑल चॅम्पियनशिप या किताबावर आपले नाव कोरले. महाराष्ट्र राज्य स्क्वॉश रॅकेट असोसिएशनतर्फे  क्वाश रॅकेट या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. २ व ३ जुलै रोजी ही स्पर्धा औरंगाबाद येथे पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातून २१ जिल्ह्य़ांतील खेळाडूंनी सहभाग दर्शवला होता.

या स्पर्धेत ठाणे जिल्ह्य़ातील खेळाडूंनी वैयक्तिक पातळीवरही सुवर्णपदके मिळवली आहेत. यावेळी ठाणे जिल्हा स्क्वॉश  रॅकेट खेळाचे अध्यक्ष अतुल राणे यांनी खेळाडूंनी त्यांचा सर्व खर्च स्वत: केल्याचे आवर्जून नमूद केले. या स्पर्धेत बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थी ऐश्वर्य सिंग, शिवम शर्मा, अभिजीत अग्रवाल, हिमांशु परमार, प्राप्ती साळुंखे, भावना गोयल आदी खेळाडू सहभागी झाले होते. सर्वच स्तरातून खेळाडूंचे कौतुक होत आहे.

ठाण्यात पावसाळी मॅरेथॉन रंगणार

मुंबई मॅरेथॉनसाठी पात्रता फेरी म्हणून समजली जाणारी तसेच हौशी मॅरेथॉनपटूंसाठी महत्वाची असलेली ‘ठाणे १० के पावसाळी मॅरेथॉन स्पर्धा’ यंदा रविवार १० जुलै रोजी ठाण्यात रंगणार आहे. हिरानंदानी इस्टेट पातलीपाडा येथून सुरू होणारी ही स्पर्धा १० किलोमीटर अंतर कापून पुन्हा तेथेच संपणार आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे घोडबंदर रोड तसेच ऱ्हिदमिक रनिंग यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली  आहे. या स्पर्धेला ठाणे जिल्हा अथलॅटिक फेडरेशनची मान्यता मिळालेली आहे. यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी स्पर्धेमध्ये ८५० हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले होते, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ घोडबंदरचे मुकेश ठोंबरे व ऱ्हिदमिक रनिंगचे अ‍ॅथलॅटीकपटू नागेश शेट्टी यांनी दिली.

रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. चंद्रशेखर कोवळेकर सकाळी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवणार असून पारितोषिक वितरण सोहळ्यात सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, महापौर संजय मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हिरानंदानी इस्टेट येथून सकाळी ६.३० वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मॅरेथॉनमध्ये भाग घेत असलेल्या स्पर्धकांना पदक व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. स्पर्धा १८ वर्षांवरील स्त्री व पुरुष यांच्यासाठी खुली असून ५ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धकाना क्रमांकांचे वाटप ८ आणि ९ जुलै रोजी हिरानंदानी क्लब हाऊस येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ वेळेत करण्यात येणार आहे. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी -2016 येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

श्रद्धा घुले, अक्षय्या अय्यर चमकल्या

सीनियर इंटर स्टेट अ‍ॅथलेटिक महिला चॅम्पियनशीप या स्पर्धेत श्रद्धा घुले हिने लांब उडीमध्ये कांस्य पदक पटकाविले, असून अक्षय्या अय्यर हिने ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. २८ जून ते २ जुलै दरम्यान हैद्राबाद येथील गचीबोवली या स्टेडिअमवर पार पडली. या स्पर्धेत कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आदी राज्यांच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. यावेळी ४७.२६ सेकंदांत अक्षय्या आणि श्रद्धाने ४०० मीटर अंतर पार केले. या दोघींच्या कामगिरीने महाराष्ट्र राज्याला सुवर्णपदक मिळण्यासाठी मोलाचे सहाकार्य मिळाले. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने ४२ वर्षांनी सुवर्णपदकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले आहे. याआधी १९७४ साली ही स्पर्धा महाराष्ट्राने जिंकली होती. महाराष्ट्र राज्याने ही स्पर्धा जिंकण्यात अक्षय्या आणि श्रद्धाचा मोठा वाटा असल्याचे त्यांचे प्रशिक्षक नीलेश पातकर यांनी सांगितले.

ज्युनियर रोलबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

ठाणे जिल्हा रोलबॉल संघटनेच्या वतीने ९ वी ठाणे जिल्हा ज्युनियर रोलबॉल अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली आहे. सेक्रेड हार्ट स्कूल, वरप कल्याण येथे शनिवार ९ जुलै रोजी दुपारी १ वाजता ही स्पर्धा घेण्यात येईल. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे जिल्हा संघटनेचे सचिव प्रताप पगार यांनी केले आहे. या स्पर्धेत निवडलेला संघ १६ जुलै रोजी सेक्रेड हार्ट स्कूल, कल्याण येथील दुसऱ्या मुंबई विभागीय ज्युनियर रोलबॉल  स्पर्धेत सहभागी होतील.

फुटबॉल स्पर्धेत ‘टाईट रायडर्स’ अव्वल

पावसाळी फुटबॉल स्पर्धेत ठाण्याच्या टाईट रायडर्सने कल्याणच्या युवक क्रीडा मंडळाचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. श्री आनंद भारती समाज, ठाणे या संस्थेतर्फे ही फुटबॉल स्पर्धा धर्मवीर क्रीडा संकुल येथे रविवारी पार पडली. या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले होते. टाईट रायडर्स या संघाच्या सुमीत नाखवा याची स्पर्धावीर म्हणून निवड करण्यात आली आहे.