प्रतिनिधी, ठाणे
अरविंद धाक्रस स्मृती चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत संतोष अकादमीच्या संघाने ठाण्याच्या वसंत विहार हायस्कूलचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. या सामन्यामध्ये संतोष अकादमीच्या संघातील यश गनिगा याने ७८ चेंडूंमध्ये नाबाद ६७ धावा करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.
या स्पर्धेत वसंत विहार हायस्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संतोष अकादमीच्या संघापुढे ११३ धावांचे आव्हान उभे केले. मात्र, संतोष अकादमीने १८ षटकांत ११४ धावा करीत सहज विजय प्राप्त केला. या सामन्यात संतोष अकादमीच्या संघातील यश गनिगाने ६ चौकार आणि १ षटकार मारून संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला. तसेच संतोष अकदामीच्या संगीत चौहान, शुभम खरात, आदित्य जाधव, यश जाधव यांनी मोलाची कामगिरी बजावली.
संतोष अकादमीचे प्रशिक्षक संतोष पाठक तसेच प्रशिक्षक राजेश सुनील व पीयूष धाक्रस यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

कयाकिंगचे प्राथमिक प्रशिक्षण
ठाणे : मुरबाड येथील दहागाव परिसरात आयोजित कायकिंग या साहसी खेळाच्या एकदिवसीय शिबिरामध्ये ६४ जणांनी प्राथमिक प्रशिक्षण घेतले. या साहसी खेळाचा मुलांना परिचय व्हावा या उद्देशातून कल्याणमधील साहसी क्रीडा संघटनेच्या वतीने २० मार्च रोजी हे शिबीर घेण्यात आले होते. कयाकिंग या साहसी खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला असून या खेळाच्या स्पर्धा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात येतात, अशी माहिती शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थीना देण्यात आली. तसेच कयाकिंग खेळाबाबतचीही माहिती या वेळी प्रशिक्षणार्थीना देण्यात आली. तसेच बोट (कयाक) बुडाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यावी, याविषयी राज वर्मा याने मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थीना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. सचिव अमित कारभारी, विक्रांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात आले होते.

साहस शिबिराचे आयोजन
ठाणे : कल्याण येथील मेरिडियन शाळेच्या वतीने उन्हाळी साहस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ९ एप्रिल आणि १६ ते २२ एप्रिल या कालावधीत शाळेच्या परिसरात हे शिबीर होणार आहे. या शिबिरामध्ये ५ ते १६ वयोगटातील मुलामुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. शिबिरामध्ये जलतरण, स्केटिंग, योगा, कमांडो ब्रिग्ज, घोडेस्वारी, रायफल शूटिंग, नेट क्लायमिंग, रोप लँडर, फ्लायिंग फॉक्स या साहसी खेळांचे प्राथमिक प्रशिक्षण
विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. हे शिबीर घेण्यामागे विद्यार्थ्यांमध्ये साहस निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश असल्याचे शाळेचे व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.

बॅडमिंटन शिबिराचे आयोजन
ठाणे : केव्हीबीएतर्फे उन्हाळी बॅटमिंटन कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. १५ एप्रिल ते ३१ मेदरम्यान कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या ठिकाणी हा कॅम्प होणार आहे. माजी राष्ट्रीय बॅडमिंटन आणि आशियाई पदक विजेते रवी कुंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कॅम्पचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती केव्हीबीएचे संस्थापक कौस्तुभ विरकर यांनी दिली. अशा प्रकारच्या बॅडमिंटन कॅम्पचे प्रथमच आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये अधिकाधिक इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Story img Loader