कोळ्यांची जळमट, धुळीचा थर, इमारतींच्या भिंतीवर पोस्टरचा कचरा, थुंकीच्या पिचकाऱ्या, खड्डे, ग्रीसने काळवंडलेला परिसर आणि घाणीचे साम्राज्य.. हे चित्र आहे, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस स्थानकातील. सध्याचे हे चित्र पालटण्यासाठी ठाण्यातील ‘प्लॅनेट फ्रेण्ड्स’ या तरुणांच्या गटाने पुढाकार घेतला असून, एसटी स्थानक चकाचक करण्याचा वसाच त्यांनी घेतला आहे. स्थानिक आमदार संजय केळकर यांना याविषयीची माहिती करून दिल्यानंतर त्यांनीही या उपक्रमास पाठिंबा देऊन या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. १७ जानेवारीपासून या उपक्रमास सुरुवात झाली असून २६ जानेवारीपर्यंत हे बस स्थानक ‘स्मार्ट स्थानक’ असेल, असा निर्धारच या तरुणांनी केला आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एस. टी. स्थानक ६० वर्षांहून अधिक जुने आहे. मीरा-भाईंदर, बोरिवली, भिवंडी, पनवेल या भागांमध्ये या परिसरातून एस. टी.च्या सुमारे ४४०० हून अधिक फे ऱ्या होत असतात. उपनगरीय रेल्वे सेवा पोहोचू शकत नाही, अशा भागांमध्ये सेवा देणारे हे स्थानक लाखो प्रवाशांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय आहेत. आदिवासी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचा मोठा राबता या स्थानकात असतो. प्रवाशांच्या दृष्टीने उपयुक्त असला तरी या परिसरामध्ये स्वच्छतेचा मात्र मोठा अभाव होता. भिंतीला सुटलेले पोपडे, जाळी, जळमटे, अनधिकृतपणे भिंतीवर लावलेले फलक, पान खाऊन माखलेल्या भिंती यामुळे या स्थानकाला विद्रूप स्वरूप आले आहे. ५० हजार चौरस फुटांच्या या स्थानकात सांडपाणी, कचऱ्याचेही मोठे साम्राज्य होते. त्यामुळे या भागातील स्वच्छतेची गरज निर्माण झाली होती. प्लेनेट फ्रेण्डचे शुभम अग्रवाल, सिद्धार्थ कर्नावट, राहुल श्रीवास्तव, आचल सदारंगानी यांच्यासह ४० तरुण कार्यकर्त्यांनी या भागाच्या स्वच्छतेचा निर्णय घेतला.
लोकवर्गणीतून सुशोभीकरण
या उपक्रमांतर्गत स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. श्रमदानातून एसटी स्थानक स्वच्छ केले जाणार आहे आणि लोकवर्गणीतून स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या तरुणांनी लोकवर्गणी जमा केली असून सुमारे ७५ हजारांचा निधी या कामासाठी जमा झाला आहे. ठाणे महापलिकेच्या वतीने हायड्रॉलिक सिडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परिसराची स्वच्छता झाल्यानंतर तेथील इमारतींवर चित्रांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे.
तरुणांच्या सहभागातून राबवण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या बस स्थानकाची फेरबांधणी करण्यात यावी, अशी जुनी मागणी असून, बहुमजली इमारत, २२०० गाडय़ांच्या दळणवळणासाठी उपयुक्त योजना, आवाराचे काँक्रिटीकरण, प्रवाशांना बसण्यासाठी सोयीस्कर जागा, पुरेशा तिकीट खिडक्या, अशा सेवासुविधांची आवश्यकता असून त्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे.
– संजय केळकर, आमदार